Monday, July 2, 2012

एका दगडात तीन पक्षी

'काय बोचते मज समजेना ह्दयाच्या अंतर्हदयाला' अशी कालवाकालव ह्दयात सुरु झाली की किल्लेप्रेमीला समजून चुकतं की एखाद्या किल्ल्याला भेट देऊन त्याला बरेच दिवस झाले आहेत आणि दारू न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या दारूड्याला जशी फक्त दारूच स्वस्थता देऊ शकते तशीच त्याच्या जीवालाही सह्याद्रीची ती ताजी हवाच स्वस्थता देऊ शकते. आमची अवस्था अगदी अशीच होती. मागचा किल्ला पाहून बरेच दिवस झाले होते. (बरेच म्हणजे जरा जास्तच - मला तर वाटतं किल्ल्यावर जाऊन आलो त्याला निदान एक वर्षं तरी झालं असावं.) तेव्हा किल्ला पहावा आणि पावसात भिजता आलं तर तेही काम साधून घ्यावं असं ठरलं आणि किल्लेमोहिमेची आखणी सुरू झाली.

किल्ल्यावर जायचं ठरल्यावर किल्ल्याचा शोध सुरू झाला. अनेक किल्ले पहायचे राहिले असताना पाहिलेले किल्ले पुन्हा पाहण्यात काहीच हशील नसल्यामुळे मी ट्रेकक्षितिज उघडलं आणि जिल्ह्यानुसार किल्ल्यांची यादी पहायला सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातले जवळपास किल्ले पाहून झाले असल्यानं मी सातारा, नगर अशा जवळपासच्या जिल्ह्यांकडे नजर टाकल्यावर सातारा जिल्ह्यात वर्धनगड आणि महिमानगड असे दोन किल्ले दिसले. हे दोन किल्ले एका दिवसात सहज करता येतात अशी उत्साहवर्धक माहिती लेखकाने स्वत: सांगितली असल्यावर मग काय? रविवारी हेच दोन किल्ले करायचे ठरले. चतुर्भुज झाल्यामुळे आमच्या कित्येक मित्रांनी 'एक व्यक्ती एक पद' या धोरणाला अनुसरून नवरा किंवा मित्र यापैकी नवरा हे पद स्वीकारून आमच्या मैत्रीचा राजीनामा दिला असल्याने मामेभावाला फोन लावला. तो तयार होताच, तेव्हा रविवारची मोहीम नक्की झाली.

रविवारी उठून आवरलं, पाण्याच्या बाटल्या, रेनकोट, कॅमेरा, खायच्या एकदोन वस्तू सॅकमधे टाकल्या आणि गाडीला किक मारून पुणे सातारा महामार्ग गाठला. हवा कुंद होती आणि रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या. आकाशात ढगांची गर्दी, हवेत किंचित गारवा आणि समोर मोकळा रस्ता असे ते 'दुनिया गयी भाड मे' असं वाटायला लावणारे धुंद वातावरण होते. ८०, १०० तर कधी चक्क १२० च्या वेगाने वा-याशी स्पर्धा करत (का त्याला टक्कर देत) मी पुढेपुढे चाललो होतो. आयुष्यात मला भेटलेल्या सगळ्या खलनायकांना मी त्या दोन तासांत माफ करून टाकले. एवढेच काय, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला थांबवून काश्मीर जरी मागितले असते तर तेही मी त्यांना (वर गुजरातची भर घालून) अगदी हसतहसत देऊन टाकले असते.

दोन तासात मी सातारला पोचलो आणि सातारा पंढरपूर रस्त्यावरच असलेल्या सातारा रेल्वे स्टेशनवरून भावाला उचलून त्याच रस्त्याने पुढे पंढरपूरकडे कूच केले. वर्धनगड किल्ला याच रस्त्यावर साधारण २५ किमी अंतरावर आहे. एके ठिकाणी गरमागरम चहा मारून अर्ध्या पाऊण तासात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावात पोचलो. एका दुकानाशेजारी गाडी लावून आम्ही आमची शिरस्त्राणे दुकानदाराकडे दिली आणि गडावर निघालो. खालून तरी गड फारसा अवघड वाटत नव्हता. पण दिसते तसे नसते हे रोहिड्याच्या (विचित्रगड) अनुभवातून आम्हाला कळून चुकले होते. सुदैवाने वर्धनगडाबाबत तसे झाले नाही. फक्त अर्ध्याच तासात आम्ही वर पोचलो. प्रत्यक्ष किल्ल्यावर एका देवीचे मंदिर वगळता पहाण्यासारखे विशेष काही नाही. पण किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे ती त्याची तटबंदी. ती अजूनही उत्तम स्थितीत आहे. मजबूत भरपूर उंच असलेली ही तटबंदी एकावेळी चार माणसे चालतील एवढी रूंद आहे. आम्ही तिच्यावरूनच किल्ल्याला एक वेढा घातला आणि देवीच्या मंदिरात जाऊन थोडी क्षुधाशांती केली. गडावर वारा मोठा भन्नाट सुटला होता आणि त्या तुलनेत देवीच्या मंदिरातले वातावरण फारच उबदार वाटत होते. त्यामुळे तिथून पाय निघत नसतानाही (नाईलाजाने) आम्ही निघालो आणि गड उतरायला सुरूवात केली. सुमारे पंधरा मिनिटांतच आम्ही खाली पोचलो. आमच्या वस्तू घेतल्या, सगळा जामानिमा चढवला आणि आमच्या पुढच्या उद्दिष्टाकडे अर्थात महिमानगडाकडे प्रस्थान केले.

वर्धनगड हा अगदी सातारा-पंढरपूर रस्त्यावरच असला तरी महिमानगड मात्र रस्त्यापासून थोडासा आत आहे. रस्ता सोडून आपण डावीकडे वळलो की साधारण अर्धा किलोमीटरवर महिमानगड गाव आहे. आम्ही पोचलो तेव्हा रविवार, त्यात दुपारची वेळ असल्याने गावात अगदी सामसूम होती. महिमानगडही वर्धनगडासारखाच मध्यम उंचीचा गड आहे. गड चढायला सुरूवात केली आणि पंधरा मिनिटांत आम्ही वर पोचलोही. गडाचा महादरवाजा आता ढासळला असला तरी त्यात कातलेले दोन गजराज आजही पाहुण्यांचे स्वागत करायला हजर आहेत. गडावर एक मारूतीचे लहानसेच पण देखणे मंदिर आहे. (एका सुबक दगडी मुर्तीची प्रतिष्ठापणा करायची आणि मग पुन्हा तिला शेंदूर फासून तिचे सुंदर रूप नष्ट करायचे हा प्रकार मारूतीच्या बाबतीत का घडतो हा प्रश्न मला नेहमी पडतो!) मारूतीच्या देवळासमोर कुणी भाविकाने फरशी टाकली आहे, तिथे आम्ही बसलो. थोडे खाल्ले आणि चक्क आडवे झालो. (झोप हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक किल्ल्यावर करतोच.) वर आकाशाकडे बघत असा झोपलो की मी एकदम तत्वज्ञाच्या भूमिकेत जातो. आत्तापर्यंत आयुष्यात आपण काय साध्य केले, आणि पुढे काय करणे बाकी आहे याचा हिशोब होतो. आपल्याला जे आवडते ते आपण करतो आहोत का, आयुष्य जसे जगायचे आहे तसे ते आपण जगतो आहोत का असे अवघड प्रश्न स्वत:ला विचारले जातात. (दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे नेहमीच नकारार्थी येतात!) असे चिंतन झाले, थोडी झोप झाली आणि मग आम्ही खाली निघालो.

पायथ्याशी पोचलो तेव्हा फक्त अडीच वाजले होते. इतक्या लवकर परतीचा प्रवास सुरू करण्याची आमची दोघांचीही तयारी नव्हती. तेव्हा आता काय पहाता येईल याची चर्चा झाली आणि साता-याच्या अजिंक्यता-याचे नाव पुढे आले. सातारला अनेकदा येऊनही आम्ही हा किल्ला पाहिला नव्हता आणि तो फारसा अवघड (त्यामुळे वेळखाऊ) नाही ही ऐकीव माहिती आम्हाला होती. तेव्हा आम्ही साता-याच्या दिशेन गाडी वळवली आणि तिथे पोचल्यावर एकादोघांना विचारून अजिंक्याता-याची वाट पकडली. किल्ल्याच्या अगदी वरपर्यंत गाडी जात असल्यामुळे हा किल्ला अगदी कुणालाही सहज पाहता येऊ शकतो. अजिंक्यता-यावर दूरदर्शनचे सहक्षेपण केंद्र आहे, त्यामुळे त्यांचे उंचच उंच मनोरे गडावर दिसतात. अजिंक्यतारा ही अक्षरे, एका देवीचे मंदिर अशी काही पाहण्यासारखी ठिकाणे वर आहेत. काही पडक्या वास्तू, एक दोन बांधलेले तलावही किल्ल्यावर आहेत. किल्ल्यावरून खाली अस्ताव्यस्त पसरलेल्या साता-याचे दृश्य दिसते. किल्ला पाहून आम्ही निघालो तेव्हा पावसाला सुरूवात झाली होती. वातावरण असे होते की असे वाटावे हा पाऊस रात्रभर चालू राहील - पण तसे काही झाले नाही. आम्ही साता-यात येईतो पाऊस थांबला आणि तो पुढे पुण्यात पोचेपर्यंत मला पुन्हा भेटला नाही.

परत जाताना भावाला वाल्ह्याला सोडायचे असल्याने सातारा-लोणंद-वाल्हे असा रस्ता आम्ही धरला. भावाला वाल्ह्याला सोडून पुढे (जेजुरीत पालखी असल्याने) परिंचेमार्गे सासवड गाठून मी पुण्याला पोचलो तेव्हा साडेनऊ वाजले होते. घरी पोचेपर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव अन् अवयव बोलू लागला होता. असे असले तरी मनात मात्र एक, दोन नव्हे तर तब्बल तीन नवे किल्ले पाहिल्याचे समाधान होते. 'मी सिंहगडावर एकच महिना राहतो, पण तिथली ताजी हवा मला वर्षभर पुरते.' असे लोकमान्य टिळकांचे एक वाक्य आहे. मलाही काहीसे तसेच वाटत होते. तीन गडांच्या या ताज्या हवेवर माझे पुढचे काही दिवस तरी नक्कीच समाधानाचे जाणार होते.

या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.

3 comments:

  1. 1 Number blog
    1 Number profile

    ReplyDelete
  2. कृपया admanachya safaricha vrutat bhag 3 liha ...

    ReplyDelete
  3. अंदमान सफर भाग - ३ लवकरच येऊ द्या .................

    ReplyDelete