Thursday, December 22, 2011

नात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा

काही गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करत आल्या आहेत. नात्यात होणारी लग्नं हा असाच एक प्रकार. आपल्या चुलत/मामेभावंडांशी लग्न केलेल्या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत. जुनी गोष्ट सोडा, आजही (चक्क शहरातदेखील) अशी लग्नं होतात. कधीतरी अशाच एखाद्या लग्नाची पत्रिका येते आणि मी पुन्हा एकदा विचारात पडतो.

नात्यातल्या लग्नांची प्रथा कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, पण ती खूप जुनी आहे हे निश्चित. आपल्या घराण्याचं रक्त 'शुद्ध' असावं, त्यात 'संकर' होऊ नये या कारणांनी पुर्वी राजघराण्यात अशी लग्न सर्रास होत. बोललं तर असंही जातं की अशा लग्नांमुळेच इजिप्तच्या राजांची पिढी अधिकाधिक अशक्त बनत गेली नि त्यात त्यांचा अंत झाला. [http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/] जुन्या काळातल्या अनेक प्रथा हद्दपार झाल्या असल्या तरी ही प्रथा मात्र अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे हे नक्की. यात एक विनोदी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्मात ह्या गोष्टी सर्रास होत असूनही लोक ह्याच मुद्यावर इतर धर्मांना नावं ठेवतात. म्हणजे मुसलमानांमधे मावशीच्या मुलीशी लग्न करतात म्हणून त्यांना नावं ठेवणा-या हिंदुंना त्यांच्या धर्मात मामाच्या मुलीशी लग्नं करणारी मुलं दिसत नाहीत का? आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय? म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न केलं तर चालेल पण मावशीच्या मुलीशी नको, असं का?

नात्यातली लग्नं टाळण्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिलं आहे भावनिक कारण. म्हणजे ज्या मुलाला/मुलीला आपण आयुष्यभर भाऊ/बहीण मानलं तिच्याशी अचानक एक दिवस लग्न करायचं हे विचित्रच नाही का? (पण अशी लग्न करणा-या लोकांना असं वाटत नसावं, नाहीतर त्यांनी ते केलंच नसतं.) दुसरं आहे शास्त्रीय. http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार अशी लग्न करणा-या जोडप्याच्या मुलांमधे काही दुर्मिळ पण गंभीर जनुकीय आजारांचं प्रमाण जास्त आढळतं. पण ही कारणं लोकांना पटत नाहीत. 'आपली घरात कुणी बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलगी बरी' असा विचार होतो आणि अशी लग्नं केली जातात. पण असं करून आपण होणा-या पिढीला संकंटांच्या मोठ्या दरीत ढकलतो आहोत हे या लोकांनी समजून घ्यायला हवे.

भारताची लोकसंख्या ११० कोटी आहे. त्यातल्या निम्म्या स्त्रिया पकडल्या तर त्यांची संख्या येते ५५ कोटी. त्यातल्या १० टक्के स्त्रिया २४ ते ३० या वयोगटातल्या म्हणजेच लग्नाळू आहेत असं मानलं तरी अशा मुलींची संख्या साधारण पाच कोटी येते. या पाच कोटी मुलींचा पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या स्वतःच्या बहिणीशी लग्न करण्याचं कारण या महाभागांपैकी कोणी मला सांगू शकेल का?

2 comments:

  1. 'गोत्र' ह्या पद्धतीचा वापर खरंतर ह्याच कारणासाठी सुरू केला. सगोत्र म्हणजेच जनुकीय समानता असणे. Genetically similar patterns असले, की जनुकीय आजारांच प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच मामाच्या मुलीशी लग्न करणे मान्य होतं, पण काकाच्या मुलीशी नाही. कारण मामाच्या मुलीचं आणि आपलं गोत्र वेगळं ठरतं. अर्थात ह्यातही दोष आहेच. कारण आई मुळे आपल्या आणि मामाच्या मुली मध्ये genetical similarity ची शक्यता वाढते. पण हे सगळं आता शास्त्र प्रगत झाल्यावर समजायला लागलेल्या गोष्टी आहेत. जो पर्यंत हे समाजात नव्हतं तो पर्यंत रुढींवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.

    ReplyDelete
  2. स्वामी विवेकानंदांनी त्या काळात ही गोष्ट समजावून सांगितली होती की लग्नं शक्यतो दोन वेगळ्या समाजांमध्ये व्हायला हवीत. आणि आपण अगदी विरुद्ध वागतो, आंतरजातीय लग्नाला अजूनही आपल्याकडे नाकं मुरडली जातात.

    ReplyDelete