Wednesday, April 21, 2010

औदुंबर

मराठी भाषेत आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या कवितांची संख्या जर कुणी काढली तर ती नक्कीच काही लाखांचा आकडा पार करेल. 'कविंची वीण मोठी!' तेव्हा त्यांच्या अपत्यांची संख्या इतर काव्यप्रकारांपेक्षा जास्त असावी हे ओघानेच आले. पण 'काळ हा सर्वोत्तम समीक्षक आहे!' हे गंगाधर गाडगीळांचे म्हणणे खरे मानले तर काळाच्या तडाख्यातून वाचलेल्या नि आजही काव्यरसिकांच्या तोंडात खेळणार्‍या कविता काही मोजक्याच. त्यात ज्ञानेश्वर, रामदास नि तुकाराम अशा काही मातब्बर मंडळीच्या रचना सोडल्या तर आधुनिक कविता अजूनच थोड्या. मराठी साहित्यक्षेत्रातली अशीच एक अजरामर कविता आजच्या आपल्या लेखाचा विषय आहे, ती म्हणजे बालकवींची "औदुंबर".

औदुंबर ही कविता फक्त आठ ओळींची आहे, पण तिच्याबाबत जेवढे आजपर्यंत लिहिले गेले आहे तेवढे दुसर्‍या कुठल्याच कवितेविषयी लिहिले गेले नसेल. उत्तम कलाकृती तुम्हाला समाधान देतात, पण अजरामर कलाकृती एवढंच करुन थांबत नाहीत, त्या तुम्हाला एक हुरहुर लावतात, एक वेगळीच अनामिक हुरहुर. बालकवींची औदुंबर कविता अशीच आहे. ती पुन्हा पुन्हा वाचली तरी वाचकाचे समाधान होत नाही. तो पुन्हा पुन्हा ती वाचतो, तिचा अर्थ लावू पहातो, पण दवबिंदुंचे मोती जसे बोटात पकडता येत नाहीत तसाच या कवितेचा अर्थही त्याला चिमटीत पकडता येत नाही!

रूढार्थाने औदुंबर ही एक निसर्गकविता आहे. अगदी साधी निसर्गकविता. एका चिमुकल्या गावाशेजारून वाहणारा एक झरा नि त्याच्या आजुबाजुच्या निसर्गाचे वर्णन करणारी एक कविता. किंबहुना चित्रदर्शी निसर्गकवितेचे हे अगदी उत्तम उदाहरण आहे. पण हे प्रकरण एवढे सोपे नाही, ते तेवढे सोपे असते तर मग आणखी काय हवे होते! ही कविता वाचली की अनेक चित्रे माझ्या अगदी डोळ्यासमोर उभी राहतात. लहानसा झरा, त्याच्याकाठची ती हिरवळ, ती पांढरी पायवाट, तो काळा डोह नि तो औदुंबर. पण हे सगळे फसवे आहे, मला तर वाटते की हा सगळा भास आहे, जे आहे ते या चित्रापलीकडेच आहे. 'काय बोंचते तें समजेना, ह्दयाच्या अंतर्हदयाला' असे काहीसे.

दिवसा आपला वाटणारा रस्ता रात्री एकदम परका वाटावा तसे काहीसे ह्या कवितेतील शब्दांबाबत आहे. निळासावळा, चिमुकलें, अडवीतिडवी, गरदी, गोड, काळिमा असे आपले नेहमीचे शब्द ह्या कवितेत काही वेगळेच भासतात. ’ऐल तटावर पैल तटावर’ या शब्दांनी जी कवितेची लयबद्ध सुरूवात झाली आहे ती लय अगदी कवितेच्या शेवटपर्यंत टिकून रहाते. निळासावळा हा शब्द खरे तर एका झ-याचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द नव्हे, पण इथे तो चपखल बसतो. त्यानंतर चार घरांचे चिमुकले गाव आपल्याला दिसते. त्यापलीकडे आहे शेतमळ्यांची गरदी, पण ती कशी? अगदी हिरवी! शेतमळ्यांमधे एक पायवाट आहे, पण ती सरळ नव्हे, ती त्यांमधे अगदी अडवीतिडवी पडली आहे. ही पायवाट कुठे चालली आहे, तर हिरव्या कुरणांमधून काळ्या डोहाकडे. बालकवी हे निसर्गकवी असले अन फुलत्या, देखण्या, प्रसन्न निसर्गाचे वर्णन असणा-या अनेक कविता त्यांनी केल्या असल्या तरी त्यांची मूळप्रवृत्ती निराशावादी होती. तरुण नि प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असताना त्यांनी केलेली आत्महत्या हे एकच उदाहरण त्यांची ही प्रवृत्ती स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. हिरवे कुरण ते काळा डोह हा पायवाटेचा प्रवास त्यांच्या जीवनप्रवासाशी सार्ध्यम्य साधणाराच नाही का? त्यानंतर कसलासा एक गोड काळिमा पाणी झाकूनसा टाकत असलेला आपल्याला दिसतो नि त्यानंतर येतो तो औदुंबर. आपले पाय पाण्यात सोडून बसलेला हा ’असला’ औदुंबर नेमका कसला आहे? एखाद्या कसलेल्या वादकाने आपल्या हातांची नजाकतपुर्ण, अशक्य, अविस्मरणीय हालचाल करून एखादा अवघड तुकडा वाजवावा नि मैफिलीची सांगता करावी तसा हा औदुंबर आपल्याला भासतो. प्रत्येक वाक्यागणीक कवितेतली गूढता चढत्या भाजणीने वाढत जाते नि ह्या ’असल्या’ औदुंबराने तिचा शेवट होतो. कविता संपते पण हा ’असला’ औदुंबर म्हणजे कसला ते काही वाचकाला शेवटपर्यंत समजत नाही! मला वाटते हेच या कवितेचे यश आहे. खूप काही सांगुनही बरेच काही न सांगणारी ही कविता आहे!

आजही मी 'औदुंबर' पुन्हा पुन्हा वाचतो, प्रत्येकवेळी तिचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो नि दरवेळी एक हरवलेपणाची भावना घेऊन परततो. ते चिमुकले गाव, ती हिरवळ, तो झरा नि तो 'तसला' औदुंबर मला दिसतात, पण मला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही. मधे काहीतरी आहे, जे मला पार करता येत नाही. एक दिवस या कवितेचा अर्थ मला सापडेल, पानावरचे दवबिंदू मी हातात घेईन याची मला खात्री आहे, तोपर्यंत प्रयत्न करत राहणे एवढेच माझ्या हाती!


ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेउन

निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर,

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

1 comment:

  1. अप्रतिम.... कविता तर आहेच आणि त्यावरचे हे तुझे पोस्ट... मला पण हि कविता वाचताना असंच हुरहूर लावणार काहीतरी वाटत असतं....
    तू खूप छान लिहिलं आहेस अभी.... :) लिहित राहा.!!!!

    ReplyDelete