या वर्षीचा उन्हाळा मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा तीव्र आहे असे आपल्याला दर वर्षी वाटते. हा उन्हाळाही अर्थात त्याला अपवाद नाही! तापमानवाढ होत आहे की नाही ह्याबाबत अनेक चर्चा घडत आहेत, त्यांचे निष्कर्ष काहीही निघोत, उन्हाळे अधिकाधिक असह्य होत आहेत (की वाटत आहेत?) हे नक्की. पण उन्हाळा काही सगळाच्या सगळा वाईट असतो असे नाही. वाळा, मोग-याचे फूल टाकलेले पाणी, खरबुज, टरबुज, द्राक्षे यांसारखी फळे, पन्हं, लिंबू अशी सरबते, दुपारच्या झोपा, आंब्याच्या रसाची जेवणे नि पत्त्यांचे डाव ह्यांसारख्या गोष्टीही तो आणतोच की. आपल्या आजुबाजुचा निसर्गही आपल्यासाठी हा उन्हाळा सुसह्य करायचा प्रयत्न करत असतो, पुरावा म्हणून उन्हाळ्यातला गुलमोहोर नि कोकिळकुजन ही दोनच उदाहरणे पुरेशी नाहीत का?
गुलमोहोर म्हटले की मला आठवतात सासवडच्या वाघिरे विद्यालयातले माझे प्राथमिक शाळेचे दिवस. आमच्या परिक्षा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात असत. शाळेत गुलमोहोराची खूप झाडे होती नि पेपरआआधीचा थोडा वेळ आम्ही त्यांखाली अभ्यास करत बसत असू. झाडे तेव्हा अगदी फुलुन आलेली असत आणि त्यांखाली लाल फुलांचा खच पडलेला असे. मधूनच एखादे फूल स्वत:भोवती गिरकी घेत खाली येई. गुलमोहोराच्या फुलाला पाच तुरे असतात, चार लाल तुरे नि एक लाल पांढरा तुरा. या लालपांढ-या तु-याला मुले कोंबडा म्हणत नि तो खातही. त्याची तुरट चव मला मात्र कधीच आवडली नाही. बारामतीजवळ पणद-याला माझ्या आत्याकडे तर अंगणातच गुलमोहोराचे झाड होते. ते झाड चढायलाही सोपे होते, दुपारी घरात सगळे झोपले की मी हळूच त्या झाडावर चढून बसत असे. त्या शांत वेळी झाडावर चढून आजुबाजुला पहात राहण्यात केवढी गंमत होती!
नंतर पुण्यात आल्यावर आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो तिथेही बरेच गुलमोहोर होते. एक मजेची गोष्ट म्हणजे ही झाडे दोन तीन वेगवेगळ्या रंगांमधे होती. अगदी लालभडक, फिकट लाल, शेंदरी(भगवा) असे रंग त्या झाडांमधे होते. हे गुलमोहोर फुलतही वेगवेगळ्या काळात. दुपारी सारे कसे शांत शांत आहे, खोलीत फक्त पंख्याचा आवाज घुमतो आहे, अशा वेळी मी हळूच उठे नि खिडकीतून गुलमोहोराच्या झाडाकडे पाहून येई, मन कसे ताजेतवाने होई! आजही लाल फुले, हिरवी पाने नि पार्श्वभुमीला निळे आकाश असा एखादा गुलमोहोर पाहिला की मला वाटते आपण तैलरंगातले एखादे भडक पण मन मोहवणारे एखादे चित्रच पहातो आहोत!
उन्हाळ्यातला दुसरा आनंददायी प्रकार म्हणजे कोकिळकुजन. सासवडला हडकोमधे आमच्या घरासमोरच एक मोठे आंब्याचे झाड होते. मार्च महिना आला की दोन गोष्टी घडत. हे झाड मोहोराने फुलुन येई नि त्यावर कोकिळेचे मधुर कुजन सुरू होई, दोन्ही गोष्टी माझ्या तितक्याच आवडत्या होत्या. उन्हाळा नि कोकिळकुजन यांची जी सांगड माझ्या मनात घातली गेली आहे ती तेव्हापासूनच. आज पुणे सातारा रस्त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर रहात असूनही आमच्या घरात कोकिळकुजन ऐकू येते हे विशेषच नाही का? सकाळ हा कोकिळेचा आवडता काळ दिसतो. सकाळी कोकिळेचा तो गोड आवाज ऐकला की कसे प्रसन्न वाटते, तो दिवस छान जाणार खात्रीच पटते! कोकिळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त झाडावर बसूनच गाते. सिमेंटच्या कट्ट्यावर बसून कूजन करत असलेली कोकिळ मी तरी अजून पाहिलेली नाही, तुम्ही?
दिवसेंदिवस आपली शहरे अधिकाधिक प्रदूषित होत आहेत, झाडे कमीकमी होत आहेत, कचरा वाढतो आहे नि तापमानवाढ होत आहे. तरीही कोकिळ थांबलेली नाही, आपल्यावर ती नाराजही झालेली नाही. ती आपली गातेच आहे! आपण निसर्गाकडे पाठ फिरवली आहे, पण निसर्गाने आपल्याकडे पाठ फिरवली नाही, हे वागणे दोघांच्याही स्वभावानुसारच आहे, नाही का?
उन्हाने होणारी काहिली तर आहेच, पण नकारात्मक बातम्यांच्या गरम हवेने हा उन्हाळा आणखी त्रासदायक ठरला आहे. कुठे बलात्कार, कुठे खून, कुठे दरोडे तर कुठे भ्रष्टाचार! ह्या सगळ्या बातम्या ऐकून जीव अगदी त्रस्त होऊन गेलेला असताना हे कोकिळकूजन ऐकले की वाटते, ही कोकिळ जणू म्हणते आहे, ’अरे जरा थांब, हेही दिवस जातील. थोडी कळ काढ, धीर धर, आशा सोडू नकोस. काही दिवसांतच या गरम हवेच्या झळा थांबतील, हवेत थंडावा येईल नि सगळ्या जीवांना होणारा त्रास ओसरेल. पावसाळा येईल नि त्या पाण्याबरोबर तुझ्या सा-या चिंताही चुटकीसरशी वाहून जातील!’
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment