Thursday, September 15, 2011

वाह ताज!

असं ब-याचवेळा होतं की एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप काही ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्षात ती गोष्ट पाहिली की आपली घोर निराशा होते. म्हणजे त्या गोष्टीची अगदी कान किटेपर्यंत स्तुती ऐकून ऐकून फुगलेला अपेक्षांचा फुगा ती वस्तू अनुभवली की फुटतो आणि आपला भ्रमनिरास होतो. ताजमहालाविषयी मी असंच खूपकाही ऐकलं होतं. सुदैवाने, प्रत्यक्षात तो पाहिल्यावर भ्रमनिरास तर झाला नाहीच, उलट त्याच्याविषयी आजपर्यंत जे काही ऐकलं ते कमीच अशी खात्री पटली.

मी इथं ताजमहालविषयी माहिती सांगत बसणार नाही. तो बांधायला २०००० मजूर नि १००० हत्ती लागले, तो बांधायला २० वर्षे लागली आणि त्यासाठी त्याकाळी ४ कोटी रुपये खर्च आला (जेव्हा सोन्याचा भाव १५ रुपये तोळा होता!) ह्या नि इतर गोष्टी सगळ्यांना माहिती असतातच. आपल्या राज्यात दुष्काळ पडला असतानाही शाहजहानने आपली मृत बायको - मुमताजच्या स्मरणार्थ तिचं स्मारक बांधावं यासाठी त्याच्यावर टीकाही होते. पण मी मात्र त्याला माफ करतो, ही देखणी, स्वर्गीय वास्तू बनवल्याबद्दल.

उत्तराखंड मधल्या 'फुलोंकी घाटी' अर्थात 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची सहल नुकतीच आम्ही केली. आमचा परत येण्याचा रस्ता आग्र्यामार्गे असल्याने येताना ह्या जगातल्या आठव्या आश्चर्याला भेट देता आली. ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही निवडलेला वार होता गुरुवार. शुक्रवारी ताजमहालाला सुट्टी असल्याने गुरुवारी तो पहाण्यासाठी बरीच गर्दी असते; त्यामुळे आम्ही सकाळी साडेसहालाच तिथे पोचलो असलो तरी आमच्या आधी बरीच मंडळी तिथे हजर होती. ताजमहालला ३ प्रवेशद्वारे आहेत. पण पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण अशा कुठल्याही प्रवेशद्वारातून तुम्ही आत शिरलात तरी तुम्हाला लगेच ताजमहालचं दर्शन होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पार करावा लागतो, 'दरवाजा-ए-रौझा'. आतूर मनाने तुम्ही हा दरवाजा पार करता आणि अचानक ताजमहाल तुमच्या समोर येऊन उभा ठाकतो. ताजमहाल पाहिला की पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा पांढराशुभ्र रंग. त्याचा तो मोठ्ठा चबुतरा, त्याचे ते सुंदर मिनार, त्याचा तो गोलाकार घुमट, कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं? त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. ताजमहालचा जो चबुतरा लांबून लहानसा दिसतो त्याचा आकार जाणवतो तो जवळ गेल्यावर. ह्या चबुत-याची उंची जवळपास अडीच पुरूष आहे हे कळल्यावर मी तर उडालोच. ताजमहालची एक खासियत म्हणजे तो लांबून तर सुरेख वाटतोच, पण जवळ गेल्यावर दिसतं की त्याच्यावरचं सूक्ष्म कामही तितक्याच उत्तम प्रतीचं आहे. लाल नि हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान दगडांची पांढ-याशुभ्र संगमरवरावरची सजावट डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडते. ताजमहालचं आणखी एक पटकन न जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी कुठल्याही दिशेने पहा, तो अगदी एकसारखाच दिसतो. ताजमहालच्या स्थापत्यविशारदांची ही कामगिरी अलौकिकच म्हणायला हवी, नाही का?

पण काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रत्यक्षच अनुभवायच्या असतात. ताजमहालचं सौंदर्य हे असंच. त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही ताजमहालला एकदा तरी भेट द्याच. तो अजून पाहिला नसेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि तो पाहिला असेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी. त्याला भेट द्या आणि त्याचं ते अनुपम, कालातीत सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवा. मला खात्री आहे, तुम्हाला तिथून निघावंसं वाटणार नाही आणि नाईलाजाने तुम्ही निघालात तरी जाताना एकदा तरी तुम्ही मागे वळून पहालच! आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज!'

[ही आहेत या सहलीमधे काढलेली ताजमहालची काही छायाचित्रे, आपल्याला ती आवडतील अशी अपेक्षा करतो. यापैकी पहिली दोन ताजमहालसमोरून, तर शेवटची दोन यमुनेपलीकडून मेहताब बागेतून काढलेली आहेत.]












No comments:

Post a Comment