Sunday, November 28, 2010

आमची अंदमान सहल - भाग १

प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात, माझीही आहेत. ’होंडा अ‍ॅकॉर्ड’ गाडी विकत घेणे, ऑस्ट्रेलियात जाऊन ’सिडने’ ते ’पर्थ’ असा मोटारप्रवास करणे आणि ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहणे ही त्यापैकी काही निवडक स्वप्ने. त्यापैकी ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहण्याचे माझे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले, त्याच स्वप्नप्रवासाची ही कथा आहे.

या प्रवासाची तयारी सुरू झाली ती जून/जुलै मधेच. मे मधे ’बदामी’ नि ’हंपी’ अशी सहल केल्यावर ’आता पुढची सहल कुठे’ अशी चर्चा झाली नि अंदमान आणि निकोबार बेटांचे नाव नक्की झाले. पुणे ते चेन्नै असा प्रवास रेल्वेने नि चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास विमानाने करण्याचे ठरले. चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास बोटीनेही करता येतो असे आम्हाला कुणीसे सांगितले खरे, पण सावरकरांना ज्या बोटीने नेले तीच बोट आजही वापरली जाते आणि चैन्नैला बसलेल्या लोकांपैकी अंदाजे निम्मेच लोक पोर्ट ब्लेअरला पोचतात असे कळल्यावर तो बेत रद्द झाला. एअर इंडियाच्या सेवेविषयी (नि हवाई सुंद-यांविषयी) फारसे चांगले ऐकले नसले तरी हा अनुभव बोटीपेक्षा नक्कीच सुखकारक असेल असे वाटल्याने शेवटी एयर इंडियाच्या महाराजालाच संधी देण्याचे ठरले.

विमानाची तिकीटे नक्की झाली, तेव्हा मी रेल्वे तिकिटांच्या मागे लागलो. पूर्वी रेल्वेच्या प्रवासात रेल्वेची तिकीटे काढणे नि प्रत्यक्ष रेल्वे प्रवास अशी दोन साहसे असत, रेल्वेने इंटरनेटवरही तिकिटे काढण्याची सोय केल्यापासून मात्र रेल्वेप्रवासाचे एकच साहस ते काय आता बाकी राहिले आहे. मी माझ्या वातानुकुलित कार्यालयात आरामदायी खुर्चीवर बसून रेल्वेची तिकिटे काढू शकेन असे मला काही वर्षांपुर्वी कुणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यातच काढले असते, सध्या मात्र महाजालाच्या कृपेने हे शक्य झाले आहे. ’टिम बर्नर्स ली’ साहेबाचे आभार मानावे तेवढे कमीच, बहुत काय लिहणे? सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकणा-या दादा लोकांसारखीच रेल्वे एजंट ही जमातदेखील काही वर्षांत नामशेष होईल की काय अशी मला आताशा भीती वाटते. असो, कालाय तस्मै नम: हेच खरे!

रेल्वेची तिकीटे मिळाली खरी, पण इथेही एक गोची होतीच. आमची रेल्वे सुटत होती रात्री (की पहाटे?) ००:१० वाजता. अनेकवेळा खात्री करूनच तिकिटे काढूनही ही तारीख चुकलेली आहे अशी भिती मला अगदी शेवटपर्यंत वाटत होती. माझे हे असेच आहे. अभियांत्रिकीचे पेपर देतानाही आपण अभ्यास करून आलोत तो पेपर आज नाहीच अशी भिती नेहमी मला वाटत असे. सुदैवाने तसे काही झाले नसले (माझे गुण पाहून काही लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत) तरी हा बागुलबुवा मला अजूनही त्रास देतोच.

असो, रेल्वेची तिकीटे मिळाली आणि मी थोडासा निर्धास्त झालो. यानंतर सुरू झाले माहिती मिळवण्याचे काम. गुगल साहेबांच्या कृपेने हेही आता खूपच सोपे झाले आहे. महाजालावर मी काही हॉटेले निवडली नि त्यांचे पैसे भरून टाकले. निदान पहिल्या दिवशी तरी हॉटेल आरक्षित केलेले असावे असा आमचा सहलीचा नियम आहे, जो आम्ही इथेही पाळला.

हा हा म्हणता दिवस गेले नि जाण्याचा दिवस उजाडला. शुक्रवार कामाचा शेवटचा दिवस असल्याने सगळ्यांचा तेव्हाच निरोप घेतला होता आणि पूर्ण दिवाळी आम्ही सुट्टीवर असल्याने दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाणही तेव्हाच झाली होती. सोमवारी पहाटे ००:१० वाजता आमची रेल्वे असल्याने रविवारी रात्री दहालाच निघणे क्रमप्राप्त होते, त्याप्रमाणे निघालो. मनाला आनंद होत असला तरी आत कुठेतरी थोडीशी धाकधूक होतीच. पुढचे १४ दिवस कसे जातील हा विचार सारखा मनाला त्रास देत होता. त्यात या सगळ्या सहलीचे नियोजन मीच केले असल्याने मला थोडी अधिकच चिंता होती. पण ’आता होईल ते होईल’ असे मी मनाशी म्हटले आणि आम्ही पुणे रेल्वेस्थानकात शिरलो.

जर गलिच्छ रेल्वे स्थानकांची स्पर्धा घेतली तर पुणे रेल्वे स्थानक त्यात नक्कीच पहिला नंबर पटकावेल असे माझे तरी स्पष्ट मत आहे. दिवाळी असल्याने लोकांची झालेली प्रचंड गर्दी, त्यांनी प्लॅटफॉर्मवरच पसरलेल्या पथा-या, सा-या स्थानकभर पसरलेला लघवीचा वास हे सगळे सहन करताना फलाटावर साधे चालणेही मुश्किल झाले होते. प्रवाशांसाठी बांधलेल्या उड्डाणपुलावर तर कुठल्याही क्षणी चेंगराचेंगरी सुरू होईल इतकी गर्दी होती. तरीही आम्ही त्या गर्दीत उडी घेतली नि आपल्या सामानासहित एकदाचे फलाट क्र. ३ वर पोचलो!

रेल्वे अस्वच्छ असली तरीही तिने प्रवास करणे मला आवडते. रेल्वेने प्रवास करताना ख-या भारताचे दर्शन घडते असे कुणीसे म्हटले आहे, आणि मला वाटते ते खरेच आहे. फलाटावरचे भिकारी, मोठी बोचकी घेऊन निघालेले मजूर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणारे शिष्ट श्रीमंत लोक आणि या सा-यांपासून स्वत:ला वेगळे ठेवणारे मध्यमवर्गीय असा एक अनोखा संगम तिथे दिसतो. असेच इकडेतिकडे पहाता पहाता वेळ कसा गेला ते कळलेही नाही नि एकदाचे १२:१० झाले. रेल्वे चक्क वेळेवर आलीही. तिकीटे नक्की झाली असल्याने डबा क्रमांक आणि बर्थ क्रमांक आमच्याकडे होतेच. आम्ही आमच्या S१ डब्याजवळ पोचलो आणि बाहेर लावलेल्या तक्त्यावर आमची नावे शोधू लागलो. तक्ता वाचताना मी एके ठिकाणी थबकलो, तिथला तो मजकूर पाहून मला आश्चर्याचा असा मोठा धक्का बसला म्हणता!

No comments:

Post a Comment