Monday, May 31, 2010

दिवाकरांच्या नाट्यछटा - १ (’पंत मेले, राव चढले’)

’पंत मेले, राव चढले’ हा वाक्प्रचार लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा हा एक विनोदी वाक्प्रचार असावा ही जी माझी समजूत झाली ती आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत कायम होती. अर्थात याचे कारण सोपे होते, या वाक्प्रचाराचा आगापिछा, त्याविषयी ईतर काहीच माहिती मला नव्हती. नंतर, हा वाक्प्रचार ज्या गोष्टीवरून आला ती मूळ गोष्ट मला वाचायला मिळाली आणि नाट्यछटा हा नवा साहित्यप्रकार नि तिचे जनक दिवाकर यांच्याशी माझी ओळख झाली. एखाद्या साहित्यकृतीवरून एखादा वाक्प्रचार रूढ व्हावा असे दुसरे कुठलेच उदाहरण मराठी भाषेत नाही, दिवाकरांचा थोरपणा दाखवून देण्यासाठी ही एकच गोष्ट पुरेशी आहे, नाही का?

दिवाकर उर्फ शंकर काशिनाथ गर्गे यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ या दिवशी आणि मृत्यु १ ऑक्टोबर १९३१ या दिवशी झाला, अर्थात फक्त ४१ वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. ४१ वर्षे जगून नि फक्त ५१ नाट्यछटा लिहून दिवाकर मराठी साहित्यात अमर झाले आहेत ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. या सगळ्या नाट्यछटा एकत्र केल्या तर त्यांनी फक्त काही पाने भरतील, तरीही मराठी साहित्याचा मागोवा घेणारा ग्रंथ जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा दिवाकर आणि नाट्यछटांचे नाव त्यात असणार यात काय शंका?

दिवाकरांच्या चार नाट्यछटांविषयी आपण या लेखमालिकेत बोलणार आहोत. यातल्या पहिल्या दोन नाट्यछटा दिवाकरांच्या अतिशय गाजलेल्या नाट्यछटा आहेत तर ईतर दोन नाट्यछटा दिवाकरांच्या सर्वोत्कृष्ट नाट्यछटांमधे गणल्या जात नसल्या तरी वैयक्तिकरित्या मला आवडणा-या आहेत.

पहिली नाट्यछटा आहे, अर्थातच, ’पंत मेले, राव चढले’!

’पंत मेले, राव चढले’ ही एकमेकाविरोधी दोन प्रसंगांचे चित्रण करणारी एक उत्कृष्ट नाट्यछटा आहे. जेव्हा कुठेतरी सुर्योदय होत असतो तेव्हा दुसरीकडे कुठेतरी सूर्यास्त होत असतो हा निसर्गनियम सिद्ध करणारी ही छटा आहे दोन भागांतली. पहिला प्रसंग आहे दिवाकरपंतांच्या घरातला. पंतांचे नुकतेच निधन झाले आहे नि त्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्याघरची स्थिती हलाखीची झालेली आहे. पंतांचे घरची परिस्थिती गरीब नि पंत हे घरातले एकमेव कमावते सदस्य, त्यामुळे ते गेल्यावर कुटुंबाचा आधारच हरवल्यासारखा झाला आहे. बरोबर आहे, जेमतेम उत्पन्न असलेले घर ते, घरातला कर्ता माणूस गेल्यावर घरचा गाडा चालणार कसा? पण अशा परिस्थितीतही पंतांच्या पत्नींनी धीर सोडलेला नाही, आपल्या तीन मुलांची जबाबदारी आता आपल्या एकट्यावर आहे हे पक्के माहिती असल्यामुळे त्या लोकांची भांडी घासणे, दळण दळणे, धुणी धुणे अशी कामे करून आपला संसारगाडा ओढण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहेत. त्यांचा मोठा मुलगा सगळी लाज बाजूला सोडून माधुकरी मागून त्यांना मदत करतो आहे. ह्या मोठ्या मुलाचे मनोगत हाच या नाट्यछटेचा पहिला भाग आहे. साधे पण परिणामकारक संवाद लिहून सगळा प्रसंग आपल्यासमोर उभा करण्याचे दिवाकरांचे सामर्थ्य ह्या नाट्यछटेत विशेषत्वाने दिसते. "असें काय? सोड मला! चिमणे, असे वेड्यासारखें काय करावें! रडतेस काय? जा! दार लावून घे - घरांत आपला गोपूबाळ निजला आहे ना? त्याच्याजवळ जाऊन बैस हं! रडूं नकोस, जा!" हे वाक्य किंवा "आई! आई!! कां ग अशी एकदम मोठमोठ्यानें रडायला लागलीस? मी माधुकरी मागायला जातों म्हणून? होय? - पण आई? तूं नाही का ग लोकांची भांडी घाशीत - दळण दळीत - धुणें धुवीत? तसेंच मी." हे वाक्य ही दोन त्याचीच उदाहरणे.

पंतांचे घर इथे दु:खाने भरून गेले असताना इकडे रावांच्या घरी मात्र आनंद अगदी ओसंडून वाहतो आहे. त्याला कारणही तसेच आहे. रावांना नुकतीच कार्यालयात बढती मिळून त्यांचा पगार तब्बल पाच रूपयांनी वाढला आहे! त्यातच ही बढती सहा वर्षांनी मिळाल्यामुळे तिचा विशेष आनंद रावांना आहे, इतका की त्यांनी तब्बल तीन रुपयांचे पेढे कार्यालयात वाटले आहेत. अर्थात रावांना बढती मिळण्यामागचे कारण सोपे आहे, त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, "नुकतेच आमचे दिवाकरपंत मेले, आणि त्यांची ही जागा मला मिळाली, बरें! - असो, ईश्वराची कृपा होती म्हणून हे दिवस तरी दिसले!" दिवाकरपंत मेले हे रावांच्या तोंडचे शब्द पहा. रावांचा अप्पलपोटेपणा आणि निर्लज्जपणा त्यातून स्पष्ट दिसतो. अर्थात एवढेच म्हणून थांबतील ते राव कसले, ते पुढे म्हणतात, "मी परवांच्या दिवशी श्रीसत्यनारायणाची पूजा करण्याचें योजिलें आहे! अहो, परमेश्वराची कृपा असली तर उत्तरोत्तर आपल्याला आणखीहि असेच सुखाचे दिवस येतील! काय? म्हणतों तें खरे आहे कीं नाहीं?" रावांचा हा स्वार्थी स्वभाव पाहून आपण चिडतो खरे, पण आपल्या आजूबाजूला जीवनात रोज असेच काहीतरी घडत असते हेही खरेच आहे, नाही का? ’सरवायवल ऑफ द फिटेस्ट’ हा नियम दररोज अवलंबला जात असलेला आपण बघतोच ना? रावांचा कितीही तिरस्कार केला तरी त्यांचा एक अंश आपल्यातही असतोच हे कुणी नाकारू शकणार आहे?

दिवाकरांनी ही नाट्यछटा लिहिली १७ मे १९१२ रोजी, म्हणजे ह्या १७ मेला या नाट्यछटेने ९८ वर्षे पूर्ण केली, तब्बल ९८ वर्षे! काम, क्रोध, ईर्षा, मत्सर, प्रेम, द्वेष अशा माणसाच्या मूळ भावनांचे ओबडधोबड पण सच्चे चित्रण करणारे साहित्य ते उत्कृष्ट साहित्य अशी उत्कृष्ट साहित्याची साधीसोपी व्याख्या करता येईल आणि माझ्यामते दिवाकरांची ही नाट्यछटा हा निकष अगदी १००% पूर्ण करते. खरे साहित्य कधीही शिळे होत नाही, कारण ते असते अस्सल, मानवी स्वभावाचे अगदी खरेखुरे चित्रण करणारे! दिवाकरांची ही नाट्यछटाही तशीच आहे, ९८ वर्षांची होऊनही तिच्यातला सच्चेपणा अगदी थोडासाही कमी झालेली नाही आणि त्यामुळेच ती आजही तितकीच अस्वस्थ करणारी आहे!


मूळ नाट्यछटा इथे वाचा - दिवाकरांच्या नाट्यछटा


2 comments:

  1. दिवाकरांच्या नाट्यछटेपैकी ’बोलावणे आल्याशिवाय नाही’ ही एक नाट्यछटा पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी होती. फक्त ती वाचूनच दिवाकरांचे नाव अजून लक्षात होते. आजून बाकीच्या नाट्यछटा वाचण्याची इच्छा अपूरीच आहे.
    लेख उत्तमच झाला आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete