Thursday, September 30, 2010

कोसला - मराठीतली माझी सगळ्यात आवडती कादंबरी

'औदुंबर'कवितेविषयी लिहिताना मी मागे असे म्हटले होते की या कवितेविषयी जेवढे आजपर्यंत लिहिले गेले आहे, तेवढे दुस-या कुठल्याच कवितेविषयी लिहिले गेले नसेल. हाच निकष जर कादंब-यांना लावला तर हा मान नक्कीच 'भालचंद्र नेमाडे'यांच्या कोसलाला जाईल. कोसलावर आजपर्यंत लिहिले गेलेले सारे लिखाण एकत्र केले तर ते नक्कीच कोसलाच्या शंभर प्रतींइतके भरेल. अर्थात या कादंबरीचे तोंड भरून कौतुक करणा-यांबरोबरच तिला मोडीत काढणा-यांची संख्याही लक्षणीय आहे हे विशेष. कोसलाबाबत आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे तुम्ही एक तर तिच्या बाजूने असता किंवा तिच्या विरूद्ध तरी. म्हणजे देवावरच्या श्रद्धेसारखं, आस्तिक किंवा नास्तिक, मधलं काही नाही. आमच्या साहेबांच्याच शब्दांत सांगायचे तर ह्या कादंबरीविषयी तुमची दोनच मते असू शकतात. 'गेल्या दहा हजार वर्षांत अशी कादंबरी झाली नाही!' असे किंवा 'ही कादंबरी महाभिकार आहे!' असे तरी. ही कादंबरी ठीकठाक वाटली असे म्हणणारा मनुष्य मला अजूनतरी भेटायचा आहे!

लेखाचे कारण म्हणजे नुकतीच कोसलावर एका मराठी संकेतस्थळावर झालेली चर्चा. ही कादंबरी मला अतिसामान्य वाटली असे मत या चर्चेच्या निवेदिकेने नोंदवले. माझ्या मते, सगळ्यात प्रथम, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले मत मांडल्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. हा खरेपणा महत्वाचा, इतरांचा विचार करून दिलेले मत, मग ते कसेही का असेना, काय कामाचे? म्हणजे, कोसला कादंबरी मोठी असेलही, पण मी म्हणतो, 'ती महाभिकार आहे' असे म्हणण्याचे स्वातंत्र्य त्यापेक्षा मोठे आहे. या स्वातंत्र्याचा आपण सगळ्यांनीच आदर केला पाहिजे, अगदी माझ्यासारख्या कोसलाच्या चाहत्यांनीदेखील.

मला विचाराल तर, कोसला ही मराठीतील सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे असे माझे मत आहे. मला असे का वाटते? माझ्या मते याचे कारण सोपे आहे, ही कादंबरी मला आपली वाटते, ती माझ्या मनाच्या तळापर्यंत जाऊन भिडते, कोसलातला पांडुरंग सांगवीकर मला अगदी जवळचा वाटतो. असे का वाटत असेल? हा पांडुरंग अगदी ख-या पांडुरंगासारखाच निरागस नि निष्पाप आहे म्हणून कदाचित. 'मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे.' अशी त्याच्या आत्मकथनाची सुरुवात तो करतो नि एका क्षणात तुम्हाला आपलेसे करतो. तो आपल्याला सारं काही सांगतो, त्याच्या कॉलेजाविषयी, तिथल्या त्याच्या फजितींविषयी, वडिलांशी झालेल्या त्याच्या वादांविषयी, आईवरच्या त्याच्या प्रेमाविषयी, त्याच्या बहिणींविषयी, त्याच्या एकूण अयशस्वी आयुष्याविषयी. अगदी जवळच्या मित्राला सांगावे तसे. आणि मग त्याचे हे आयुष्य त्याचे रहातच नाही, ते आपले बनते. तुम्ही स्वत:ला पांडुरग सांगवीकरमधे शोधू लागता. पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यावर गडबडलेला पांडुरंग, मित्रांना स्वखर्चाने चहा पाजणारा पांडुरंग, मेसच्या भानगडीत सापडणारा पांडुरंग, आजूबाजूचे 'थोर' लोक पाहून आपणही त्यांच्यासारखे व्हावे अशी इच्छा धरणारा पांडुरंग आणि आपल्या बहिणीच्या अकाली जाण्याने व्यथित झालेला पांडुरंग. पुण्यात सहा वर्षे काढून नि वडीलांचे दहा बारा हजार वर्षे खर्चूनही हा घरी परततो तो पदवीशिवायच. त्याच्या वडिलांच्या शब्दांत, 'तुला बारा हजारांनी गुणलं तरी सहासात वर्षांचा गुणाकार शून्यच'. आयुष्याची लढाई यशस्वी झालेल्या नायकांची अनेक चरित्रे वाचलेली असली तरी का कोण जाणे, रुढार्थाने आयुष्यात अपयशी झालेल्या पांडुरंग सांगवीकरशी तुम्ही जास्त जवळीक साधता. मजेची गोष्ट आहे नाही ही?

कोसलाचे आणखी एक आकर्षण म्हणजे भालचंद्र नेमाड्यांची भाषा. किंबहुना मराठी भाषेला असा सहज वळवणारा लेखक मी जी ए कुलकर्ण्यांनंतर अजूनतरी दुसरा पाहिलेला नाही. एखाद्या रंगाधळ्या माणसाला अचानक रंग दिसू लागल्यानंतर जसे वाटेल अगदी तसेच नेमाड्यांची ही मराठी वाचताना वाटते. कोसल्यातल्या प्रत्येक वाक्याला हा 'नेमाडे' स्पर्श आहे. 'पण मी अगदी सगळंच सांगणार नाही. कारण ते तर माझ्या सद-यांनासुद्धा ठाऊक आहे.' 'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारून टाकून तिच्या कातड्याचा डफ करून त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.' 'पण ज्या अर्थी बापानं आपल्याला विकत घेतलं त्या अर्थी हा गृहस्थ आता आपला बाप लागत नाही. हा आपला मालक, आपण ह्याच्या खानावळीत जेवतो.' 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच. ती वगैरे काही कमावता येत नाहीत. तेव्हा गमावली ही भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच' ही काही उदाहरणे.

समीक्षकांनी पांडुरंग सांगवीकर या व्यक्तीरेखेचे अनेक अर्थ काढले. कुणाला त्याचे जगणे 'सारे काही मिथ्या आहे' या अंतिम सत्याचे एक उदाहरण वाटले तर कुणाला तो गौतम बुद्धासारखा वाटला. कुणाला त्याच्या गरीब मित्रांचे जगणे चटका लावून गेले तर कुणाला त्याच्या बहिण मनूचे जाणे. मला मात्र पांडुरंग सांगवीकर असामान्य वाटला तो आधी सामान्य आहे म्हणूनच. नेमाड्यांनी स्वतः अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे 'शंभरातल्या नव्याण्णवांसारखा' - खूप काही करायला जाणारा, सगळ्यांपासून वेगळं बनू पाहणारा नि शेवटी सर्वसामान्यांसारखंच जगणारा. तुमच्या आमच्यासारखा!

तर अशी आहे ही कोसला. ती तुम्हाला आवडो, न आवडो, पण तिला टाळून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हे मात्र खरे!

2 comments:

 1. aabhjeet ne agdi mazya awadya vishayala haat ghatla. anek lokanpaiki mihi kosla cha bhakt aahe. yawar kiti bolu ani kiti lihu aase hote

  gajanan thalpate

  ReplyDelete
 2. अप्रतिम लिहिले आहेस. 'कोसला' माझ्या मनाच्या सुद्धा अत्यंत जवळ आहे.

  केदार केसकर
  http://keskarkedar.blogspot.in/

  ReplyDelete