'चिरकूट बांगलादेशला ढेकणासारखे चिरडू!' अशी घोषणा काही वर्षांपुर्वी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाक-यांनी केल्याचे सगळ्यांनाच आठवत असेल. बांगलादेशने भारताची काही कुरापत काढल्याने संतप्त होऊन ठाकरेंनी ही महागर्जना केली होती. पण नुसत्याच गर्जना करायच्या नि काहीच कृती करायची नाही ही बाळासाहेबांची नि कसल्या गर्जनाही करायच्या नाहीत नि कसली कृतीही करायची नाही ही आपल्या सरकारची सवय लक्षात घेता बांगलादेशच्या केसालाही धक्का लावायची हिम्मत भारताला झाली नाही हे सांगायलाच हवे का?
या गर्जनेचे अचानक स्मरण होण्याचे कारण म्हणजे याच छोट्याश्या ढेकणांनी सध्या अमेरिकेत घातलेला मोठा गोंधळ. 'या ढेकणांना ढेकणासारखे चिरडू' असे उद्गार अमेरिकन लष्करप्रमुखांनी अजून काढले नसले तरी त्यांनी 'अमेरिका बाहेर दोन नि दस्तुरखुद्द अमेरिकेत ढेकणांविरुद्ध एक अशी तीन युद्धे लढत असल्याचे (खाजगीत) मान्य केल्याचे आमचा वार्ताहर (खाजगीत) कळवतो. न्यूयॉर्क टाईम्स [http://www.nytimes.com/2010/08/31/science/31bedbug.html], लॉस ऍंजलिस टाईम्स [http://www.latimes.com/sns-health-bed-bugs,0,4665398.story], टाईम [http://www.time.com/time/travel/article/0,31542,1955180,00.html] अशा मुख्य वृत्तपत्रांमधे रोज प्रसिद्ध होणारे याबाबतचे लेख यावरून या समस्येची व्याप्ती लक्षात यावी. ढेकूण हे कीटक नेमके कसे आहेत, ते लपतात कुठे, ते रक्त पिल्याशिवायही किती दिवस जगू शकतात यासारख्या माहितीने वृत्तपत्रांमधले रकानेच्या रकाने भरले जात आहेत. हॉटेले, हॉस्पिटले, घरे यांसारख्या ठिकाणी ढेकणांच्या झुंडीच्या झुंडी आक्रमणे करत आहेत आणि त्यांच्याशी लढतालढता अमेरिकन्स अक्षरश: हतबल झाले आहेत. (खरं तर हा विषय एखाद्या होलिवूडपटासाठी किती साजेसा आहे, यावर 'स्लीपिंग विथ द एनिमी', 'द वॅम्पायर' असा एखादा झकास ऍक्शनपट बनू शकतो; एखादा हॉलिवूडनिर्माता इकडे लक्ष देईल काय?)
माझ्या मते, ढेकणांमुळे अमेरिकेच्या झालेल्या या दयनीय स्थितीचा भारत सरकारने अगदी पुरेपूर फायदा उचलायला हवा. भारतीयांना सतत घाणेरडे घाणेरडे म्हणून चिडवणा-या अमेरिकनांचा सूड घेण्याची चांगली संधी सध्या आपल्याकडे आहे. अमेरिकन कपडे/बूट यांवर बंदी, अमेरिकेतून येणा-या प्रवाशांना (त्यांच्या अध्यक्षांसह) रॉकेलचे फवारे मारल्यावरच भारतात प्रवेश आणि अमेरिकेतील ढेकूण समस्या सुटेपर्यंत अमेरिकेच्या सा-या अधिकृत सरकारी निमंत्रणांना नकार असे काही उपाय करून भारत सरकार अमेरिकेची नालस्ती करू शकते. माननीय परराष्ट्रमंत्री इकडे लक्ष देतील काय?
कोणी काहीही म्हणो, पण माझ्या मते, जगातील एकमेव महासत्ता असे स्वत:चे गोडवे गाणा-या अमेरिकेला साधा ढेकणांचा नि:पात करता येऊ नये ही मोठ्या शरमेची गोष्ट आहे. संपूर्ण जगाचा अनेकवेळा विध्वंस करता येण्याइतकी विघातक अस्त्रे असूनही अमेरिकेला साध्या ढेकणांशी लढता येऊ नये? की हा ढेकणांचा बदला आहे? 'अमक्याला सहज चिरडू, तमक्याला सहज चिरडू' असे म्हणणा-या अमेरिकनांना 'आता आम्हाला चिरडून दाखवा' असे तर ते म्हणत नसतील? का हे अमेरिकेच्या दिवसेंदिवस घटत्या सामर्थ्याचे लक्षण मानावे? एकेकाळी मोठमोठ्या राष्ट्रांना घाम फोडणारी अमेरिका आता साध्या ढेकणांपासून स्वत:ला वाचवू शकत नाही यावरून कसले अर्थ काढावेत?
कुणी काहीही म्हणो, पण ढेकणांनी सध्या अमेरिकेची झोप उडवलेली आहे हे मात्र खरे!
ता.क. अमेरिकेत ढेकणांनी घातलेल्या हैदोसावरची मजेदार व्यंगचित्रे इथे पहा. [http://cagle.msnbc.com/news/Bedbugs/main.asp]
Subscribe to:
Post Comments (Atom)
असे काहितरी आपण छापले की तेसुद्धा आपल्यासारखेच म्हणू शकतील की स्वाईन फ्लू आपल्याकडे मुद्दाम पाठवला तसे... आपण ढेकूण पाठवले असे...
ReplyDeleteत्यांचे प्रश्न त्यांनाच सोडवू दे त्यावर आपण हास्य केल्याने आपली कोणतीही प्रगती साध्य होत नाही...
असो, काही वाटले म्हणून टंकले...
>> पण नुसत्याच गर्जना करायच्या नि काहीच कृती करायची नाही ही बाळासाहेबांची नि कसल्या गर्जनाही करायच्या नाहीत नि कसली कृतीही करायची नाही ही आपल्या सरकारची सवय लक्षात घेता बांगलादेशच्या केसालाही धक्का लावायची हिम्मत भारताला झाली नाही हे सांगायलाच हवे का?
ReplyDeleteपरफेक्ट परफेक्ट !! क्या ब्बात !!
भारी झालं लेख !!