Friday, July 29, 2011

गुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि वाचनवेड

लेखाचे निमित्त आहे 'गुगल आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करत आहे' अशी बीबीसी वर नुकतीच वाचलेली बातमी. या विषयावरचा निकोलस कार यांचा http://en.wikipedia.org/wiki/Is_Google_Making_Us_Stupid हा लेखही रोचक नि प्रसिद्ध आहे. तर प्रश्न असा, खरेच असे घडते आहे का? की हा फक्त शास्त्रज्ञांचा एका सनसनाटी दावा आहे?

मला वाटते या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. गुगल हे एक प्रातिनिधीक उदाहरण, माझ्या मते सा-या इंटरनेटचाच मानवी बुद्धिमत्तेवर बरावाईट परिणाम होतो आहे. जरी आपल्याला जाणवत नसले तरी बारकाईने पाहिले तर हे सहज दिसते की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आज आपल्याकडे थांबण्यास वेळ नाही. यात माहिती किंवा ज्ञान मिळवणेही आलेच. आपल्या सगळ्या प्रश्नांना आज आपल्याला झटपट उत्तरे हवी आहेत. त्यामुळेच एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली तरी येणा-या संकेतस्थळांवर जास्त वेळ थांबण्याची आपली तयारी नसते. 'तुमच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही, हे आम्ही चाललो!' आपले आयुष्य अतिशय वेगवान होत आहे याचेच हे द्योतक आहे. पण याचा एक मोठा तोटा असा की यामुळे आपली एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगाने कमी होते आहे. एखादी संकल्पना वाचून, तिचा सखोल अभ्यास करून ती समजून घेण्याऐवजी तिच्यातला फक्त आपल्याला आवश्यक तो भाग थोडक्या वेळात वाचून ती आत्मसात करण्याकडे आपला कला वाढला आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या विषयावरची पुस्तके वाचून त्याची माहिती मिळवण्यापेक्षा त्या विषयावरचा विकिपीडिया लेख वाचून तो विषय समजावून घेणे आज आपल्याला सोपे वाटते आहे.

साहजिक आहे, हवी ती माहिती इंटरनेटवर सहज, आयती मिळत असताना ती शोधणे, नको ती माहिती गाळणे आणि हवी ती माहिती वेगळी करणे एवढे कष्ट कोण घेणार? मला वाटते आज पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे! असे का झाले असावे? माझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अ‍ॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही!)

हे सारे असले तरी इंटरनेटचा वापर टाळणे किंवा कमी करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. काम, मनोरंजन, ज्ञानार्जन, वस्तूंची खरेदी विक्री, प्रियाजणांशी संपर्क या दैनंदिन गोष्टी करताना आपल्याला त्याची गरज पडत असताना, ते दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात अधिकाधिक जागा व्यापू लागले असताना त्याचा वापर थांबवणार कसा? मात्र हा वापर थांबवता येणार नसला तरी आपण तो आटोक्यात नक्कीच ठेवू शकतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर हवा तेव्हाच नि हवा तेवढाच करणे, तो करतानाही कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून न राहणे, कमी श्रमात मिळणा-या फळाचा मोह कटाक्षाने टाळणे, पुस्तकांचे वाचन नियमितपणे करणे आणि छंद किंवा इतर एखाद्या कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करत राहणे असे काही उपाय आपल्याला करता येतील.

सगळ्यात मजेची गोष्ट अशी, हा लेख संपवताना मला जाणवते आहे की ह्या लेखासाठी लागलेले सारे संदर्भ मी गुगलवरूनच शोधले आहेत आणि त्यातही is google making us stuipid? हा माझा शोध गुगलने is google making us stupid? असा सुधारून दाखवला आहे. लेखातले माझे म्हणणे पटवून देण्यासाठी हे एकाच उदाहरण पुरेसे नाही काय?

No comments:

Post a Comment