Friday, March 25, 2011

गाणी, गाणी, गाणी!

मला वाटतं प्रत्येक माणसाचा असतो तसा प्रत्येक गाण्याचाही एक स्वभाव असतो. काही लोक सतत दुर्मुखलेले, तर काहींमधे उत्साह ठासून भरलेला. काही हसरे तर काही उदास. काही खूप वर्षे एकत्र घालवूनही लांब लांब भासणारे तर काही क्षणात काळजाला चटका लावून जाणारे. गाणीही अशीच असतात. काही मन प्रसन्न करणारी तर काही उदास. काही नाचरी तर काही गंभीर. काही वात्रट तर काही या दुनियेतली अंतिम सत्यं सांगणारी.

आता 'गुनगुना रहें हैं भँवरें, खिल रही है कलीं कलीं' हे आराधना चित्रपटातलं गाणं घ्या. हे गाणं कानावर पडलं की मन कसं आनंदानं भरून जातं. भर उन्हाळ्यात अचानक एक कारंजं सुरू व्हावं आणि थंड पाण्याचे आल्हाददायक तुषार अंगावर यावेत असं काहीसं वाटतं हे गाणं ऐकलं की. आराधनामधलंच 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू' हे गाणंही तसंच. शंभर वर्षांच्या चिरनिद्रेतून जागा झालो तरी हे गाणं मी सुरुवातीच्या तुकड्यावरूनही सहज ओळखीन. शर्मिलीमधलं 'ओ मेरी शर्मिली', जॉनी मेरा नाम मधलं 'पल भर के लिये कोई हमें' ही गाणी याच पठडीतली. दिवसभर कामं करून थकून आलात की ही गाणी ऐकावीत, थकवा पळालाच म्हणून समजा. संगीत ऐकवलं की पीकं जोमानं वाढतात आणि गाई जास्त दूध देतात ही वाक्यं ही गाणी ऐकली की मुळीच खोटी वाटत नाहीत.

दुसरीकडे 'जिंदगी का सफर है ये कैसा सफर' हे सफर चित्रपटातलं गाणं. कुठलीतरी खोल जखम अचानक उघडी पडावी अन्य त्यातून भळाभळा रक्त वहायला लागावं असं हे गाणं ऐकलं की दरवेळी का वाटावं? 'जिंदगी को बहोत प्यार हमनें किया, मौतसेभी मोहोब्बत निभाएंगे हम' - एक कसलीशी, व्यक्त न करता येणारी वेदना. ह्दयात दुखतं तर आहे पण नेमकं कुठे ते समजू नये असं काहीसं. तीच गत 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाँ' ह्या आप की कसममधल्या गाण्याची. (बाकी ह्या गाण्यात वरचढ काय आहे, म्हणजे शब्द, संगीत की गायकाचं कसब हा एका वेगळ्या लेखाचा मुद्दा होऊ शकतो.) हे गाणं ऐकलं की असं का वाटावं की हा नायक नव्हे तर मीच कुठेतरी चाललो आहे एकटा. माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना मागे टाकून. दूर कुठेतरी, लांब, जिथे फक्त दु:ख आणि दु:खच भरलेलं आहे अशा दिशेने. 'तेरी गलियोमें ना रखेंगे कदम आज के बाद' हे गाणं असंच. ह्या गाण्यातला दर्द ऐकून असं का वाटावं की नायक नायिका नव्हे तर जगणंच सोडून चालला आहे? मराठीतलं 'वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले' हे गाणं याच गटातलं. हे गाणं लागलं की वाटतं एखाद्या उदास संध्याकाळी दूरवर कुणीतरी एखादं वाद्य वाजवत असावं आणि वा-यावर तरंगणारे त्याचे सूर आपल्याला अस्वस्थ करत जावेत.

आता काही वात्रट गाणी. उदाहरणार्थ गोविंदा नि चंकीचं आंखेमधलं 'ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता' - माझं जाम आवडतं गाणं. हे कधीही लागलं तरी मी पूर्ण ऐकतो आणि ते दर वेळी माझ्या मनात स्मितहास्य फुलवतंच. आँटी नंबर वन चित्रपटाचं शीर्षकगीत, हिरो नंबर वन मधलं 'मै तो रस्तेसे जा रहा था', कसौटीमधलं 'हम बोलेगा तो बोलेगे के बोलता हैं', हाफ टिकट मधलं 'आके सीधी लगी दिलपे जैसे कटरिया' किंवा चल्ती का नाम गाडी मधलं 'बाबू समझो इशारे' ही गाणी अशीच. ती ऐकावी नि गालातल्या गालात हसावं. तेजाबमधलं 'एक दो तीन, चार पाँच छे...' हे असंच एक मारू गाणं. हे लागलं आणि आजूबाजूला कुणी नसलं, की मी थोडीशी का होईना, कंबर हालवून घेतोच.

काही गाणी एकदम बिनधास्त - 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं फिक्र को धुएंमे उडाता चला गया' असं म्हणणारी. काही 'मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा' असं म्हणत आपल्याच मस्तीत जगणारी. काही 'ए मेरे वतनके लोगों, जराँ आँखमें भरलों पानी' असं म्हणत रडवणारी तर काही 'दुनियामे रहनाहोतो काम करो प्यारे, हाथ जोड सबको सलाम करो प्यारे' असं म्हणत जगण्याचं कटू तत्वज्ञान सांगणारी.

तर अशी ही गाणी. वेगवेगळ्या स्वभावांची. वेगवेगळ्या रंगांची. ही नसती तर जगणं अशक्य झालं असतं हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment