Saturday, April 16, 2011

हचिको - एक इमानी कुत्रा

विकीपिडीयावरचा एखादा लेख वाचून डोळ्यांच्या कडा पाणावल्या असं तुमचं कधी झालं आहे का? माझं असं नुकतंच झालं, हचिको या इमानी कुत्र्यावरचा लेख वाचून.

१९२४ साली, टोक्यो विद्यापीठात शेतकी खात्यात काम करणा-या एका प्रोफेसर साहेबांनी अकिता जातीचं एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आपल्या घरी आणलं, त्याचं नाव होतं 'हचिको'. छोटा हचिको थोड्याच दिवसात आपल्या धन्याच्या घरी रूळला, एवढंच काय, दर संध्याकाळी आपल्या धन्याचं स्वागत करण्यासाठी तो 'शिबुया' रेल्वेस्टेशनवरही जाऊ लागला. हा दिनक्रम चालू राहिला साधारण एक वर्षे. मे १९२५ सालच्या एका दिवशी मात्र अघटित घडलं, प्रोफेसर साहेब त्या दिवशी घरी परतलेच नाहीत. ते आता कधीच घरी परतणार नव्हते; मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला होता! छोट्या हचिकोच्या लक्षात मात्र ही गोष्ट आलीच नाही, तो रोजच्या नेमानुसार आपल्या धन्याला आणण्यासाठी रेल्वेस्टेशनवर पोचला. आपला धनी आता कधीच परत येणार नाही हे त्या इमानी जीवाला कसे कळणार?

काही दिवस उलटले, हचिकोसाठी एक नविन घर शोधून त्याला नविन मालकाच्या ताब्यातही दिले गेले. हचिको मात्र तिथून निसटला, पुन्हापुन्हा. आपल्या जुन्या घरी अनेकदा धडकल्यावर आपले मालक इथे राहत नाहीत हे शेवटी त्या मुक्या जीवाला समजले असावे, पण ते सध्या आहेत कुठे हे त्याला कसे समजावे? आपले मालक इथे रहात नसले तरी ते शिबुया स्टेशनवर आपल्याला नक्की भेटतील असे हचिकोला वाटले आणि त्याने आपल्या नेहमीच्या वेळी स्टेशनवर आपल्या धन्याची वाट पाहण्याचे ठरवले. हचिको आपल्या धन्याची वाट पहातच राहिला, एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वर्षे!

रेल्वे स्थानकात येण्याच्या ठराविक वेळी नेमाने तिथे उभी असणारी हचिकोची मुर्ती काही दिवसांत लोकांच्या ओळखीची झाली, यापैकी काही लोकांनी त्याला त्याच्या धन्याबरोबर पाहिले होते. या लोकांनी त्याला खाणे-पिणे द्यायला सुरूवात केली. प्राध्यापकसाहेबांचा एका विद्यार्थी हचिकोचा हा प्रवास जवळून पहात होता, त्याने हचिकोवर अनेक लेख लिहिले. टोक्योच्या 'असाही शिंबून' दैनिकात हे लेख प्रसिद्ध झाल्यावर सा-या जपानचे (नि जगाचेही?) लक्ष हचिकोकडे वेधले गेले.

आपल्या इमानी वृत्तीमुळे सगळ्या जगभरात प्रसिद्ध झालेल्या या श्वानोत्तमाचा अखेर ८ मार्च १९३५ रोजी मृत्यु झाला. आपल्या कुत्र्यावरील प्रेमामुळे प्रत्यक्ष स्वर्गालाही नकार देणा-या अर्जुनाची कथा आपण अनेकवेळा ऐकली आहे, स्वर्गात पोचल्यावर आपले धनी जर स्वर्गात नसतील तर आपणही तिथे जाणार नाही असेच हचिको म्हटला नसेल कशावरून?

बुद्धीची देणगी असल्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा वरचढ आहोत असं आपण कितीही म्हटलो तरी प्रत्यक्षात परिस्थिती याहून अगदी उलटी आहे असं माझं मत आहे. हचिकोची ही कहाणी वाचल्यावर काहीसं असंच वाटतं, नाही?

हचिकोवरील विकीपिडिया लेखाचा पत्ता : http://en.wikipedia.org/wiki/Hachik%C5%8D

1 comment:

  1. अभिजित,
    हे अरभाट नि चिल्लर तर त्याहून नाही.
    मस्त खूपच छान.सुंदर माहिती दिलीस.
    हा लेख वाचल्यावर लिंक वर सुद्धा गेलो नाही ह्यातच सगळ आलं

    ReplyDelete