शनिवारी झालेल्या प्रचंड उत्कंठावर्धक सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले आणि २०११चा क्रिकेट विश्वचषक दिमाखात आपल्या खिशात घातला. तब्बल २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक जिंकला आणि करोडो भारतीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. विश्वचषक जिंकणे ही मोठी गोष्ट खरीच, पण ज्या चिकाटीने नि जिगरबाज वृत्तीने खेळ करून महेंद्रसिंग धोनीच्या संघाने तो जिंकला तिला खरोखरच तोड नाही!
यावेळेचा विश्वचषक मला खास वाटला तो खेळाडूंमधे दर सामन्यात दिसलेल्या विजयी वृत्तीमुळे. भरपूर क्षमता पण चिकाटीचा, जिद्दीचा अभाव आणि पडखाऊ वृत्ती हे खेळांमधे (त्यात क्रिकेट आलेच) भारताचे नेहमीच दुखणे राहिले आहे. पण यावेळी चित्र वेगळे होते, यावेळी प्रत्येक सामन्यात दिसली ती भारताची आक्रमकता, विजय खेचून आणण्याची वृत्ती, लढवैय्येगिरी. आणि माझ्या मते हेच खूप महत्वाचे आहे. नशिबाने रडतखडत सामने जिंकण्यापेक्षा लढून हार पत्करणे कधीही चांगले, नाही का?
अंतिम सामन्यापर्यंतचा भारताचा प्रवास सोपा नव्हता. उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तान असे दोन महाभयंकर संघ त्यांच्या वाटेत उभे होते. पण धोनीच्या संघाने त्यांना हरवले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल हरल्यावर क्रिकेटप्रेमींमधे निराशा पसरली पण श्रीलंकेचा पहिल्या काही षटकांचा खेळ पाहिल्यावर ती आनंदात परिवर्तित झाली. अर्थात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे याचा प्रत्यय लगेच आला; शेवटच्या काही षटकांमधे श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची व्यवस्थित धुलाई केली नि भारतीय क्रिकेटरसिकांचा जीव पुन्हा टांगणीला लागला. डावाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग बाद झाला नि टांगणीला लागलेला हा जीव थोडा आणखी वर गेला. सचिनने दोन सुरेख चौकार मारून चांगली सुरुवात केली खरी, पण एका सुंदर चेंडूवर तो बाद झाल्यावर, खरे बोलायचे तर, भारतीय क्रिकेटरसिकांनी सामना वजा खात्यात टाकला होता. नंतर जे झाले ते अभूतपूर्व होते. त्यावेळी जे घडले ते भारतीय नव्हते, ते अस्सल अभारतीय होते. तिसरा, चौथा, पाचवा अशी बळींची रांग पहाण्याची क्रिकेटरसिक अपेक्षा करत असताना गंभीर नि कोहलीने मात्र त्यांना उच्च दर्जाच्या क्रिकेटचे दर्शन घडवले. कोहली बाद झाल्यावर धोनी मैदानात आला. इकडे गंभीर दुस-या बाजूला टिकून होता. उत्तम फलंदाजी काय असते हे त्याने त्या दिवशी सा-या जगाला दाखवून दिले. शंभराला तीन धावा बाकी असताना तो बाद झाल्यावर वाटले, त्याचे शतक हुकल्याचे दु:ख त्याच्यापेक्षा क्रिकेटरसिकांना जास्त झाले असेल. गंभीर गेला तरी कप्तान धोनी बिचकला नाही, तो चिवटपणे तिथेच टिकून राहिला. नायक शब्दाची व्याख्या स्पष्ट करेल असा त्याचा त्या दिवशीचा खेळ होता. द्रौपदीने धावा केल्यावर जसा कृष्ण धावत आला नि त्याने तिचे लज्जारक्षण केले, धोनीचे वागणे त्या दिवशी काहीसे तसेच होते.
नंतर? नंतर शंभर, नव्वद, पन्नास अशी विजयासाठी आवश्यक धावांची संख्या कमीकमी होत गेली नि स्टेडीयममधल्या भारतीयांचा आवाज वाढतवाढत गेला. शेवटच्या चेंडूवर धोनीने षटकार मारून चषकाला आपल्याकडे ओढले, मला वाटते हा चुरशीचा सामना संपविण्याचा याहून देखणा दुसरा प्रकार कुठला असूच शकत नव्हता! संघातल्या नवोदित खेळाडूंनी हा विजय सचिनला अर्पण केला. या महान खेळाडूने केलेल्या विक्रमांच्या पुष्पगुच्छात फक्त एकाच गुलाबाची जागा रिकामी होती, झाले तीही भरली गेली.
आणखी काय लिहावे! धोनी, या विजयासाठी तुला नि तुझ्या संघाला खूप खूप धन्यवाद देऊन हा लेख संपवतो. भारतातल्या आजकालच्या घटना पाहून भारतीय असल्याची लाज वाटावी अशी परिस्थिती आली असताना तू मात्र भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असा पराक्रम घडवलास, याबद्दल तुझे आभार किती मानावेत?
ता.क. भारतीय संघाने प्रचंड पराक्रम दाखवून हा विजय मिळवला असला तरी आपल्या ओंगळवाण्या वागण्याने त्यावर बोळा फिरवण्याचे काम राजकारण्यांनी केलेच. याला सुरुवात केली दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी. संघातील फक्त दिल्लीच्या खेळाडूंना त्यांनी बक्षिसे जाहीर केली. शीला दिक्षीत बाई, ही बक्षिसे जर सगळ्या खेळाडूंना दिली असती तर आपले सरकार भिकेला लागले असते काय? याचीच री पुढे उत्तराखंड, महाराष्ट्र, पंजाब नि गुजरात सरकारने 'आपापल्या' खेळाडूंना पारितोषिके जाहीर करून ओढली. अरे क्रिकेट हा एक सांघिक खेळ, निदान त्याचा विश्वचषक जिंकल्यावर तरी असा कद्रूपणा दाखवू नका!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Abhya masta lihitos re..Keep it up..Amit Joshi
ReplyDelete