"लोकशाहीत, तुमची जी लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं." या अर्थाचं जोसेफ हेलर या अमेरिकन कादंबरीकाराचं एक वाक्य आहे. आपल्या भारतातली सध्याची परिस्थिती पाहिली की मला हे वाक्य अगदी तंतोतंत पटतं.
आता हेच पहा - परवा सत्यसाईबाबांचं निधन झालं. ह्या घटनेचं वार्तांकन करताना भारतातल्या जवळपास प्रत्येक वृत्तपत्रानं त्यांचा उल्लेख 'थोर संत/प्रत्यक्ष देव' असा केला आणि वेळोवेळी त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांमधला एक चकार शब्दही आपल्या लेखात येणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्या आश्रमात घडलेले लैंगिक अत्याचाराचे प्रकार/त्यांनी उभं केलेलं प्रचंड बेहिशोबी आर्थिक साम्राज्य यांविषयी कुणी 'ब्र'ही काढला नाही. बीबीसीनेही बाबांच्या मृत्युची बातमी छापली पण बातमीच्या शेवटी But his critics say that many of (his) activities were publicity stunts. They say that he was a persuasive fraudster who used his huge popularity to avoid being investigated over allegations of murky financial practices and sexual abuse. ही पुष्टी जोडायला ते विसरले नाहीत. हा भारतीय माध्यमांचा खोटारडेपणा म्हणता येईल की आपले वाचक/प्रेक्षक नाराज होऊ नयेत म्हणून नाईलाजाने केलेली तडजोड?
सत्यसाईबाबांच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या अतिमहत्वाच्या लोकांची यादी थक्क करणारी होती. आपल्या 'आदरणीय' राष्ट्रपतीजी किंवा आडवाणीजी राहूद्या पण सचिन तेंडुलकर, मनमोहन सिंग आणि एपीजे अब्दुल कलाम हेही सत्यसाईंचे भक्त होते हे पाहून त्यांच्याविषयीचा आदर थोडा कमी झालाच. बाकी सगळे ठीक, पण कलाम साहेब तुम्ही पण? आता बाबांवरचे आरोप सिद्ध झाले नव्हते असे त्यांचे भक्त म्हणू शकतातही पण लुंगासुंगा राजकारणीही सगळ्या यंत्रणेला कसा खिशात घालू शकतो हे आपल्याला दिसत असताना बाबांवर कारवाई होईल नि त्यांवरचे आरोप सिद्ध होतील ही अपेक्षा आम्ही कशी ठेवावी? अर्थात राजकारण्यांचे नि सत्यसाईंचे संबंध होते यात नवल काय? प्रचंड मोठ्या जनशक्तीला काबूत ठेवण्याचं आध्यात्मिक बाबांजवळ असणारं सामर्थ्य आणि काळा पैसा सहज पांढरा करण्याची त्यांची शक्ती या दोन गोष्टींमुळे ते राजकारण्यांना जवळचे वाटतात तर आपल्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी राजकारणी त्यांना. पण हे सामान्य जनतेला समजवणार कोण? सत्यसाईबाबांवर कितीही गंभीर आरोप होवोत, आसाराम बापूंच्या आश्रमात नरबळींचे प्रकार होवोत किंवा स्वामी नित्यानंद प्रणयचाळे करोत, जनतेचा बाबांवरचा विश्वास मात्र अबाधितच! शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, मुंबईचे अनिरुद्ध बापू, कोकणातले नरेंद्र महाराज या सगळ्या महाराजांना मोठे करणारे कोण? आपण सामान्य लोकच. महाराष्ट्र जरी आपल्या पुरोगामित्वाची घमेंड मारत असला तरी समाजाला सदुपदेश करण्यासाठी ज्ञानेश्वरी सांगणा-या ज्ञानेश्वरांपेक्षा किंवा समाजातल्या बुवाबाजी, ढोंग, अंधश्रद्धा यांवर आपल्या अभंगातून प्रहार करणा-या तुकोबांपेक्षा सध्या लोकांना शिर्डीचे साईबाबा किंवा नरेंद्र महाराज जवळचे वाटतात हे वास्तव नाकारून कसे चालेल?
'आम्ही वाटेल तसे वागू, तुम्ही आम्हाला शिकवू नका.' हा न्याय मग पुढे इतर ठिकाणीही लागू होतो. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता याबाबत मंत्र्यांना दूषणे देत असतानाच 'आपल्या' आमदाराला आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा विजयी केले जाते, सलमान खानवर, संजय दत्तवर कितीही गंभीर आरोप असोत, त्यांचे चित्रपट आवडीने बघितले जातात आणि इतरांना नावे ठेवता ठेवता कित्येक नियम आपल्या सोयीने मोडले जातात. आपण असे वागत असताना देशात मात्र उत्कृष्ट लोकशाहीची अपेक्षा धरतो, हे चुकीचे नाही का?
हे सगळं बदलायचं असेल तर आपणच प्रयत्न करायला हवेत. पण आपण असं करू शकू? आपल्याला हे जमलं तरच आपला देश महान बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असं आपण म्हणू शकू, नाहीतर, नुसता म्हणायलाच 'मेरा भारत महान'! हो की नाही?
Subscribe to:
Post Comments (Atom)
अरे पण अभिजीत दादा , सत्य साई बाबाणी काहीही केलेले असोत पण शेगाव चे गजानन महाराज यांच्या सारख्या संता वर का बोल्तोस...
ReplyDeleteत्यांनी तर एक रुपयाही जमवला नव्हता रे....
अमर, गजानन महाराजांनी पैसा कमावला नसेल पण आज त्यांच्या नावावर मोठमोठे आश्रम चालतातच ना? ते ट्रस्ट, तिथल्या लाथाळ्या हे प्रकार होतातच ना? नि त्यांची भक्ती का करायची? तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर जवळचे वाटतात की चमत्कार करणारे गजानन महाराज? एका मनुष्यप्राण्याने दुस-या मनुष्यप्राण्याची (जरी तो दिवंगत असला तरी) पुजा करावी हे तुम्हाला चुकीचे वाटत नाही का?
ReplyDeleteचमत्कार करणारा भोंदू असलाच पाहिजे या गृहीतकाच्या आधारे विवेचन करणे हा अंधश्रद्धा दूर करण्याचा मार्ग नव्हे.श्रद्धा-अंधश्रद्धा यातला फरक व्यक्तिनिरपेक्ष मापदंडानी सिद्ध केला जावयास हवा.
ReplyDeleteफार छान, तुझ लिखाण आवडल
ReplyDelete