Friday, October 21, 2011

खडकवासल्याचा धडा!

खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहून भल्याभल्यांनी आ वासला असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे या हमखास विजयी होणार अशा पैजा अनेकांनी मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात भाजपाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

हा पराभव श्रीमती वांजळेंचा असला तरी प्रसारमाध्यमांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा असल्याचे चित्र निर्माण केले आणि माझ्या मते ते अगदी योग्यच होते. अजितदादांनी ही मिरवणूक (कारण नसतानाही) विलक्षण प्रतिष्ठेची बनवली आणि त्याची परिणीती त्यांच्या जोरदार दाततोड आपटी खाण्यात झाली. श्रीमती वांजळेंच्या पराभवाला अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही मुख्य कारणांकडे पाहू.

श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे त्यांनी आयत्या वेळी घेतलेली कोलांटीउडी. वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे दिवंगत पती मनसे पक्षाचे पण या निवडणुकीत त्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मतदारांना फारसे रूचले नाही. 'आज इथे तर उद्या तिथे असे करणारे नेते परवा आपल्याला वा-यावर सोडणार नाहीत कशावरून?' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय? वांजळे मनसेकडून ही निवडणूक लढल्या असत्या तर नक्कीच विजयी झाल्या असत्या हे अगदी बालवाडीतला मुलगाही सांगू शकत होता; पण काही अगम्य कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ती त्यांची घोडचूक होती. जनतेच्या सहानभुतीचा फायदा मिळणार असल्याने त्यांचा विजय नक्की असे मानून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेही, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आपला विश्वासघात झाला असे मानणारे मनसे कार्यकर्ते श्रीमती वांजळेंच्या विरोधात गेले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लावणारे ठरले.

श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे अजित पवारांची टगेगिरी. गेल्या हजार वर्षात या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत असा त्यांचा गोड गैरसमज आहे, जो कुणीतरी दूर करायला हवा. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले आहेत खरे, पण ते फक्त शरद पवारांच्या पुण्याईवर. ते जर शरद पवारांचे पुतणे नसते तर आज काय करत असते हे सांगायलाच हवे का? आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार? पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार? (इथे नुकत्याच आलेल्या 'बेंगलुरूत मेट्रो सुरू' या बातमीची आठवण येते - बेंगलुरूत मेट्रो धावली देखील, पुण्यात अजून तिचे कामही सुरु झालेले नाही.) पण प्रश्न असा, अजित पवार यातून काही बोध घेतील की आपला खाक्या असाच चालू ठेवतील?

बाकी भीमराव तापकीरांच्या विजयाची अजूनही कारणे होती. त्यांचा मितभाषी, नम्र स्वभाव, त्यांनी धनकवडीत केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. जनतेमधे सरकारविरुद्ध असलेली चीडही त्यांच्या विजयाला सहाय्यभूत ठरली.

असो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच!

5 comments:

 1. अभिजित ,
  आम्हा तमाम जनतेचा आवडता राजकीय पक्ष (कोणतीही) काँग्रेस हाच आहे,आणि आम्ही मोठ्या मनाचे असल्याने राष्ट्रवादी,तृणमूल वगैरे किरकोळ फरक हे आमच्या साठी केवळ निवडणुकी पुरते असतात,आणि ते फरक "सुशिक्षितांना" टी.व्ही.वर चर्चेचे गुऱ्हाळ चालवायला असतात त्या मुळे कुठल्या ही काँग्रेस बद्दल कोणी ब्र काढल्यास स्वाभाविकपणे आमचे कान लांब होतात.काँग्रेसने असे असंख्य पराभव ह्या पूर्वी हा हा म्हणता पचवले आहेत,ह्या किरकोळ पराभवाची काय घेऊन बसलात ? खरे तर पब्लिकला मेमरीच नसते असे आमचे स्पष्ट मत आहे पण तसे खुल्लम खुल्ला म्हणणे म्हणजे सुशिक्षित लोकांना जागे केल्या सारखे होते म्हणून सोई साठी केवळ आपण "पब्लिक मेमरी शॉर्ट असते,असं इथे म्हणूयात.

  खरे तर पक्षांतर्गत शिस्त कशाशी खातात हे इतरांनी आमच्या काँग्रेस पासून शिकावे.,मागे उगाच नाही देवरसांनी कौतुक केलं होत ? मूग गिळून गप्प रहाणे म्हणजे काय ?ते कशाशी खातात ? ह्याचे जर कुणाला संशोधन करायचे असेल तर त्याने इथे ते अनुभवावे,पडताळावे.तो स्वतः संशोधनाअंती मूग गिळून गप्प बसेल.एकमेका सहकार्य करू अवघे धरू "श्री "पंथ ....ह्याचे आचरण आम्ही गेली ६३ वर्षे कोणतीही प्रसिद्धी अथवा गाजावाजा न करता करत आलो आहोत. (सुपंथ हा फक्त जनते साठीच असावा असे हि आमचे एक खाजगीतले मत आहे) " खाऊन" माजा पण टाकून माजू नका ",किंवा..तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या च्या धर्तीवर "तुम्ही "खा",दुसऱ्याला पण थोडे खाऊ द्या" हा परोपकारी संदेश गेली ६३ वर्षे आम्ही जनते पर्यंत पोहोचवत आलोय त्याचे कुणाला काही कौतुकच नाही ? तथापि स्थितप्रद्न्यता ही मुळात आमच्या रक्तातच भिनल्याने आम्ही त्याचे वाईट वाटून घेत नाही.
  राज्याच्या निवडणुकांच्या आता येऊ घातल्या आहेत.त्या मुळे ..उरलेल्या वर्षभरा साठी जे घरातील झुंबर म्हणून वापरले जाते ..ते.. पण दिवाळी आल्यावर ज्याला आकाश कंदील म्हणून,संबोधायचे ते काढणार आहोत....थोडे बुचकळ्यात पडलात ना ? कि नक्की काय प्रकार आहे म्हणून ? पण सांगतो... अहो एकदम साधं नि सोप्पय ! आमच्यातल्या आमच्यात किरकोळ उखाळ्या पाखाळ्या काढून फक्त निवडणुकी पूर्वी स्वतःची वेगळी चूल मांडायची,स्वतःचा हिस्सा पदरात पडून घ्यायचा नि पुन्हा नेहमीचीच आयडिया ... आलं नां लक्षात ? बसं तेच.. त्याने काय होत कि लोक नेहमी प्रमाणे गंडतात नि निवडणुकीच्या निकाला पर्यंत येडपटासारख्या फक्त चर्चा करत बसतात,आणि दरम्यानच्या काळात आम्हाला आमची खरी ताकद लक्षात येऊन सरकारातल्या वाट्यावर वाटाघाटी करता येतात हो ? युतीनेच ही आयडिया पूर्वी आम्हाला शिकवली ,पण त्या खुळ्यांना सत्ता कशाशी खातात तेच माहित नव्हते नि नाही,त्या मुळे ह्या आयडीयेची अंमलबजावणी आम्ही आमच्या "स्थितप्रज्ञता" ह्या अंगभूत गुणाच्या जोरावर आज वर करीत आलो आहोत. एनी ऑब्जेक्शन मिलोर्ड ? ( हे असं विचारायचा एक प्रघात असतो म्हणून म्हटले... तसं कुणाचंच ऑब्जेक्शन असलं काय नि नसलं काय,सगळ्यांना तर, तसं ही आम्ही कोलतोच.... )

  अभिजित,आपल्या म्हणण्या नुसार
  "असो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच! "
  माणसाने नेहमी आशावादी रहाणे,असणे हे केव्हाही त्याच्या प्रगतीचेच लक्षण असते,ह्यात शंका नाही.तथापि...गेल्या ६३-६४ वर्षांचा इतिहास पाहता तो आशावाद सत्यात कितपत उतरेल.. नव्हे, निदान त्याचे किंचितसे प्रतिबिंब तरी पडेल कि नाही ह्या बद्दल शंका घ्यायला जागाच जागा आहे.बघुयात.खरे तर बोध जनता घेत नाही ही वास्तवता आहे.

  निवडणुकीच्या निकाला पेक्षा तेथे झालेल्या मतदानाची टक्केवारी हा विषय जास्त गंभीर आहे.सुशिक्षित म्हणवणाऱ्या पुणेकरांचा पर्यायाने जनतेचा सध्याच्या एकूणच राजकारणा कडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब तर नव्हे?

  ReplyDelete
 2. हार होणार हे निश्चित होतेच. जनमानस तसेच होते.
  (खडकवासला विधानसभा मतदारसंघ रहीवाशी)

  ReplyDelete
 3. >>या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत
  अगदी...

  आणि mynac एकदम जबरदस्त कमेंट...

  ReplyDelete
 4. वांजळे हे वांजळे म्हणूनच निवडून आले होते, मनसेचे उमेदवार म्हणून नव्हे.

  ReplyDelete
 5. निवडणूकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता सगळेच पक्ष किंवा सगळेच उमेदवार नापास झाले आहेत असे म्हणता येईल. लोकांनी या खेळखंडोबाकडे सरळसरळ कानाडोळा केला. खरं कौतूक मनसेचे करावे लागेल त्यांचा निर्णय योग्यच होता. मनसेने मतदारांचा कल ओळखला होता असे म्हणता येईल काय?

  ReplyDelete