अखेर नारायण सुर्वे गेले! गेले अनेक दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती; ती ढासळायला सुरुवात झाली सुमारे दोन वर्षांपुर्वी. पण त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी केलेली प्रार्थना देवाने ऐकली नि आपल्या चाहत्यांबरोबर अजून काही वेळ घालवण्याची सवलत त्यांना दिली. यावेळी मात्र तो कठोर झाला नि त्याने नारायण सुर्व्यांना थेट आपल्याकडे बोलवून घेतले!
या जगात अनेक कल्पनातीत गोष्टी घडतात, सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असते असे म्हणतात ते ह्यामुळेच. नारायण सुर्वेंचा जीवनप्रवासही असाच आहे. कचराकुंडीमधे सोडलेल्या एका मुलाला एक गिरणीकामगार उचलतो काय, त्याला मोठा करतो काय नि हा मुलगा पुढे आपल्यासारख्याच दुर्दैवी जीवांच्या जीवनकहाण्या जगासमोर मांडणारा एक मोठा कवी बनतो काय, हा एक चमत्कारच नव्हे तर काय!
१९२६ किंवा १९२७ साली एकेदिवशी एका आईने आपल्या बाळाला चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर सोडले नि रस्त्यावरचा हा पोरका जीव गंगाराम सुर्वे या गिरणीकामगाराने उचलून घरात आणला. जे देणे शक्य होते ते सारे काही सुर्वे दांपत्याने या मुलाला दिले; घर, शिक्षण, आईबापाचे प्रेम आणि आपले नावदेखील! पण १९३६ साली गंगाराम सुर्वे निवृत्त झाले नि कोकणात आपल्या गावी निघून गेले; नारायणाला क्रूर मुंबईच्या तावडीत सोडून. मग नारायण कुणा कुटुंबात घरगडी, कुठल्या हॉटेलात कपबश्या विसळणारा, कधी दूध टाकणारा पो-या तर कधी कुठल्या कारखान्यात कामगार अशी लहानसहान कामे करत राहिला. अखेर ज्या शहरात कपबशा विसळल्या त्याच शहरात शिक्षक बनण्याचा पराक्रम नारायणाने केला आणि १९६१ साली तो महापालिकेच्या नायगाव क्र. एकच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला! अर्थात् या सा-या प्रवासात नारायणाने कविता करणे कधीच सोडले नाही, ती त्याला शेवटपर्यंत साथ देत राहिली, श्वासासारखी!
कुठल्याही भाषेत साहित्य लिहिणा-यांमधे दोन गट असतात. अवतीभोवतीची संपन्नता, विपुलता, आनंद पाहून स्वत: संतोष पावणा-यांचा नि त्याचे चित्रण करणा-यांचा एक गट तर आपल्या आजूबाजूची विषमता, दारिद्र्य, दु:ख पाहून अस्वस्थ होणा-यांचा नि त्याचे चित्रण करणा-यांचा दुसरा गट. अर्थात् यातील दुस-या गटाच्या लोकांमुळेच जागतिक साहित्य संपन्न होत असते हे कोण नाकारू शकणार आहे? नारायण सुर्वे हे असेच एक कवी होते. ’कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे’ असा सारस्वतांना इशारा देत त्यांनी आपली कविता सुरु केली. ह्या कवितेत होता ना कसला आव, ना कसला इशारा ना कसली द्वेषभावना, तिच्यात होती फक्त वेदना. वेदना ’भाकरीचा चंद्र शोधण्यात आख्खी जिंदगी बरबाद झाल्याची’. ’मास्तर, तुमचंच नाव लिवा...’ यासारख्या कवितेत कुण्या आईची तर ’मनिऑर्डर’ सारख्या कवितेत कुणा वेश्येची. पण अशी वेदना मनात असूनही सुर्व्यांचे मन करपले नाही. कुणाविषयीही राग किंवा अढी त्यांच्या मनात कधीच राहिली नाही. एवढे सोसूनही सुर्व्यांचे मनातले पाणी निखळ राहिले ते गढूळले नाही, हे विशेषच नाही का?
आयुष्याच्या पुर्वार्धात नारायण सुर्व्यांवर केलेल्या अन्यायाची सव्याज परतफेड नियतीने नंतर केली. महाराष्ट्र, भारत सरकारचे अनेक पुरस्कार, १९९५ सालच्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ११९८ साली पद्मश्री असे अनेक गौरव सुर्व्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अनुभवायला मिळाले. अर्थात् एवढे सारे होऊनही सुर्वे अगदी साधेच राहिले, अगदी त्यांच्या कवितांसारखे. आयुष्याच्या अखेरची काही वर्षे त्यांनी मुंबई सोडून जवळच्याच नेरळ गावी काढली. मुंबईने दिलेल्या चटक्यांमुळे आपली शेवटची वर्षे कुठेतरी निवांत जागी घालवावीत असे वाटून त्यांनी हा निर्णय घेतला असेल काय?
ज्या कष्टक-यांची दु:खे नारायण सुर्व्यांनी सा-या जगापुढे कवितारुपाने मांडली त्या सा-या शोषितांच्या मनात आज ह्याच ओळी असतील -
सुर्वेसाहेब,
तुम्ही कवितेऐवजी रद्दी विकली असती तर काय झाले असते,
निदान देणेक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते.
असे झाले नाही; तुम्ही शब्दांतच इतके नादावला, बहकला,
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते.
पण तुम्ही नसता तर हे सूर्यचंद्र, तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते
आमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात तुम्हाशिवाय सोबतीस कोण असते
चला बरे झाले; तुम्हाला कवितेतच खराब व्हायचे होते!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment