Thursday, August 12, 2010

घरं आणि आठवणी !

ह्या घरातले आमचे शेवटचे काहीच दिवस उरलेत, पण अजून तरी आठवणी दाटून येऊन उगाचच वाईट वाटणं असं काही घडलेलं नाहीये. जसजशी घर सोडायची तारीख जवळ येईल तसतसे दु:खाचे कढ दाटून येतील किंवा मन भरून येईल असं वाटलं होतं खरं, पण प्रत्यक्षात तसं घडण्याची काही एक चिन्हे दिसत नाहीयेत. किंबहुना मनाला असं काही वाटत नसल्यामुळेच थोडंसं विचित्र वाटतंय हे मात्र नक्की.

खूप घरं बदलली आम्ही. आई नि पप्पांचं लग्न झालं आणि त्यांनी सासवडला काटकर चाळीत संसाराला सुरूवात केली. त्या एका खोलीत आई, पप्पा, काका नि आत्या असे चार जण रहात. त्या एका खोलीच्या भयाणकथा आईने आम्हाला अनेकदा ऐकवल्या आहेत नि दर वेळी तिच्या सासरच्या लोकांचा उद्धार करायची संधी साधून घेतली आहे. तिथून आम्ही म्हस्के ह्या प्रेमळ घरमालकांच्या वाड्यात रहायला गेलो. मी तेव्हा खूपच लहान होतो, त्यामुळे तिथले दिवस मला काही आठवत नाहीत. नंतर एक दोन वर्षांतच म्हाडाची नविन घरयोजना हडको सुरू झाली नि मग आम्ही हडकोत रहायला गेलो. ’पप्पा रंगीत टीव्ही घ्यायला निघाले होते, पण मी त्यांना थांबवलं नि घडकोत पैसे गुंतवायला सांगितले’ असं आई नेहमी आम्हाला सांगायची. आम्ही घडकोत रहायला गेलो तरी म्हस्के वाड्यात नेहमी जायचो हे मात्र आजही आठवतं. म्हस्के परिवार होताच तसा. राजबिंडे म्हस्के काका, मराठा असूनही ब्राह्मणी वळणाने बोलणा-या देखण्या नि अतिप्रेमळ म्हस्के बाई, त्यांच्या दोन मुली नि माझ्यापेक्षा मोठा एक मुलगा मनू. त्यांचा तो मोठ्ठा वाडा नि त्यातलं ते चिंचेचं झाड मला अजून आठवतं. सासवड आम्ही कधीच सोडलं असलं आणि सासवडचं ते घरही दोन वर्षांपुर्वीच विकलं असलं तरी म्हस्के आज्जीआजोबांकडे आम्ही अजूनही जातो. आत्ता काही महिन्यांपुर्वीच जाऊन आलो त्यांच्याकडे, अजूनही तस्सेच आहेत दोघे. प्रेमळ नि माया लावणारे. जेवूनच जा असं नुस्तं म्हणून न थांबता जेवूनच पाठवणारे. मंजूला (माझी आत्या) का नाही घेऊन आलात असं विचारणारे.

हडकोत आम्ही ७/८ वर्षे होतो. पहिली ते सहावी अशी सहा नि त्याआधीची एक/दोन वर्षे मी तिथे काढली असावीत. हडकोचं हे घर माझं आवडतं कारण ते जमिनीवर, बैठं होतं. आमच्या अगदी घरासमोर नव्हे पण जरा उजव्या बाजूला एक आंब्याचं मोठ्ठं झाड होतं. माझ्या मित्राच्या घरामागे किंवा आमच्या घराजवळच्याच पटांगणात आम्ही क्रिकेट खेळत असू. घराजवळच्या पटांगणाचा उपयोग पतंग उडवण्यासाठीही होत असे. भोंडल्याच्या दिवसात घरासमोरच्या जागेतच भोंडला खेळला जाई आणि कोजागिरीचा नैवेद्य चंद्राला इथेच मिळे.

नंतर पप्पांची बदली झाली नि आम्ही राजगुरूनगरला आलो. इथल्या माझ्या आठवणी काही खूप सुखद नाहीत. आम्ही पहिल्यांदा जिथे राहिलो तो एक बंगला होता. मालक पुढच्या दोन खोल्यांत नि आम्ही मागच्या दोन खोल्यांत रहात होतो. संडास सामाईक. आमच्या खोल्या संपल्याकी लगेचच एक मोठ्ठं शेत होतं. ह्याच्यापलीकडच्या शेतात आमचा क्रिकेटचा डाव रंगे. आमच्या घराशेजारचा मोकळा प्लॉट मी नि शेजारच्या एका आजोबांनी मोकळा केला होता नि तिथे काही दिवस आम्ही बॅडमिंटन खेळत होतो असं मला अंधुकसं आठवतं. घरात रहायला आल्यावर काही दिवसांतच आमच्याकडच्या लहानसहान वस्तू(कपड्याचे साबण/गोडेतेल ई.) अचानक कमी व्हायला लागल्या नि लवकरच हे आमच्या घरमालकांचेच प्रताप आहेत हे आमच्या लक्षात आले. आम्ही आमच्या घराची किल्ली त्यांच्याकडे ठेवून त्यांच्यावर जो विश्वास ठेवत होतो त्याचा ते गैरफायदा घेत होते. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे किल्ली ठेवणं बंद केलं तेव्हा ’का हो?’ असं घरमालकीणबाईंनी खोदून खोदून विचारलेलं मला स्पष्ट आठवतं. ह्या लोकांकडे एक कुत्राही होता, राजा नावाचा. त्याला जिन्याच्या पॅसेजात मोकळे सोडले जाई, त्यामुळे गच्चीवर गेले की राजासाहेबांच्या शौचरांगोळीतूनच मार्ग काढावा लागे. हळूहळू राजाची तब्येत ढासळत गेली नि एक दिवस बिचा-याचा कार्यभाग आटोपला. मग घरमालकांनी नि त्यांच्या मुलाने त्याला मागे शेतात पुरले. घरमालकांना एक मुलगा नि दोन मुली अशी तीन अपत्ये होती. त्यापैकी धाकटी तायडी गोड गोड बोलून नेहमी मला त्यांचे सामान आणण्यासाठी पिटाळे (आमचे घर लुटण्यासाठी?) हेही मला अगदी स्पष्ट आठवते.

ह्या सा-या कटकटींना कंटाळून आम्ही हा बंगला सोडला नि तिन्हेवाडी रस्त्यावरच्या एका चाळीत राहायला गेलो. पण इथे आमची ’आगीतून फुफाट्यात’ अशी अवस्था झाली. बंगल्यात संडास सामाईक होता पण तो आमच्यात नि घरमालकांत. इथे ह्या चाळीत १२ की १४ घरांना फक्त तीन संडास होते. स्वत: मालक नि एक ’अतिमहत्वाचे’ भाडेकरू ह्या दोघांना मात्र घरातच संडास होते. अजून एक गोष्ट म्हणजे वर घरात बाथरूम नव्हे तर चक्क मोरी होती. इथे पाणी नियमितपणे येत नसे, त्यामुळे ते आले की घरातल्या झाडून सगळ्या पात्रांमधे साठवून ठेवावे लागे. चाळीत आमचे घर वरच्या मजल्यावर अगदी कडेला असल्याने घरात येताना सगळ्यांच्या घरातली मनोहारी दृश्ये इच्छा नसतानाही पहावी लागत. कहर म्हणजे आम्ही पोरे या लहानशा जागेतही प्लास्टिकच्या बॉलने चक्क क्रिकेट खेळत असू. ह्या घरमालकांचा मुलगा महेश नि त्याचा मेंगळट चेहरा मला आजही अगदी स्पष्ट आठवतो.

खेडमधे सातवी नि आठवी अशी दोन वर्षे काढल्यावर आम्ही माझ्या नववीत पुण्याला आलो. पुण्यातला आमचा फ्लॅट पूर्ण झाला नसला तरी नववीत मला नूमवित प्रवेश घेतल्याने आम्हाला पुण्यात यावेच लागले. इथे आम्ही बिबवेवाडीत महेश सोसायटीत अगदी आतल्या बाजूला एक घर भाड्याने घेतले होते. इथेही खेडचीच पुनरावृत्ती झालेली, म्हणजे मालक खाली नि आम्ही वर. दोन लहानश्या खोल्यांमधे आम्ही कसे रहात असू असा विचार आत्ता केला की डोके भंजाळते. काही घरमालकांची जात मराठा किंवा ब्राह्मण नसते तर ते फक्त ’खडूस घरमालक’ या जातीचे असतात, आमचे घरमालक असेच होते. एकदा मला इस्त्री करत असताना पाहिल्यावर ’तुम्ही तर म्हटला होतात घरी इस्त्री करणार नाही म्हणून...’ असे त्यांनी माझ्या आईला विचारले. त्यावर माझ्या आईनेही ’तो इस्त्री करत नाहीये, फक्त कशी करायची ते शिकतोय’ असे खमके उत्तर दिले. (आमचे वीजेचे मीटर वेगळे नसल्याने आम्ही वीज काटकसरीने वापरावी असा आम्हाला घरमालकांचा प्रेमळ आग्रह होता.) या घरात आमच्या समोरच एक छोटे कुटुंब भाड्याने रहात होते, त्यांचा मुलगा भारीच गोड होता. या काकू नेहमी आमच्याकडे येत नि तासनतास गप्पा मारत, कधीकधी आईही त्यांच्याकडे जाई. या घरमालकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या त्यांना चक्क दोन बायका होत्या!

पण सुदैवाने काही महिन्यांतच आमचा फ्लॅट पूर्ण झाला नि आम्ही ९५ साली तिथे रहायला गेलो. हे घर मला आवडले, तिथे खाली आजूबाजूला बरीचशी मोकळी जागा होती नि झाडेही. इथली गुलमोहोराची झाडे उन्हाळ्यात फुलत नि त्या गरम दिवसात डोळ्यांना अंमळ गारवा देत. क्रिकेट खेळायची आमची इथली जागा म्हणजे आमच्या इमारतीखालचे पार्किंग. पार्किंगमधे क्रिकेट खेळणे नि तिथेच असलेल्या नळावर ढसाढसा पाणी पिणे हा आमचा उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला नि दर रविवारचा नियमित कार्यक्रम होता. हे घर रस्त्यापासून अगदी जवळ आणि तरीही अगदी शांत होते. असे असले तरी हा प्लॅट होता अगदी छोटा. एक बेडरूमचा. नि शिवाय त्याची रचनाही विचित्र होती. म्हणजे आगगाडीच्या डब्यासारख्या एका पाठोपाठ एक खोल्या. म्हणजे पहिला दिवाणखाना, नंतर स्वयंपाकघर. मग डाव्या बाजूला बाथरूम नि उजव्या बाजूला स्वच्छतागृह. त्यानंतर बेडरूम. हळूहळू हा फ्लॅट आम्हाला लहान पडायला लागला नि पुन्हा आमचा नविन घराचा शोध सुरू झाला.

हा शोध संपला पुणे सातारा रस्त्यालगतच्या आमच्या सध्याच्या प्लॅटमधे. इथे आम्ही २००४ साली रहायला आलो आणि गेली सहा वर्षे आहोत. अर्थात इथेही अडचणी होत्याच. हा फ्लॅट २ बेडरूमचा असला तरी आकाराने लहान. शिवाय इथे सोसायटी वगेरे प्रकार नसल्याने अनंत अडचणी. आम्ही आल्यावर एक का दोन वर्षांनी आमच्या सोसायटीतला ट्रान्सफॉर्मर उडाला आणि आम्ही जवळजवळ एक आठवडा अंधारात काढला. कारण सोसायटी नव्हतीच आणि बिल्डरला इमारत पूर्ण झाल्यावर तिची पर्वा कशाला? इथे सुरक्षाव्यवस्था काही नाही, तेव्हा आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती. शिवाय पार्किंगची जागा लहान असल्याने गाड्या उभ्या करायला अडचण. त्यात सोसायटी साफ करायची काही व्यवस्था नसल्याने सगळीकडेअ कच-याचेच साम्राज्य. शिवाय हा फ्लॅट रस्त्याला लागूनच असल्याने आम्हाला वाहनांच्या/मिरवणुकांच्या आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागे. सात वाजले की खालच्या हॉटेलांमधे बनणा-या अनेक खाद्यपदार्थांचा एक संमिश्र नकोसा वाट घरात घमघमे. शेवटी आम्ही वैतागलो नि हा फ्लॅटही सोडायचा निर्णय घेतला. पण का कोण जाणे, आता पुन्हा फ्लॅटमधे रहायला जायची आमची इच्छा नव्हती. आता बंगल्यातच रहायला जावे असे आम्ही ठरवले नि जागेचा शोध सुरू झाला. फ्लॅट शोधणे सोपे पण जागा शोधणे अती अवघड. अनेक जागा पाहिल्यावर त्यातल्या एखाददुसरी जागा आम्हाला आवडे. जर जागा आवडली तर ती परवडणारी नसे. आणि ती परवडणारी असली तर ती कटकटीची असे. जवळजवळ दोन वर्षे आम्ही जागा शोधत होतो, पण आम्हाला पसंत पडेल अशी जागा काही सापडेना. शेवटीशेवटी तर एखादा फ्लॅटच विकत घ्यावा असे वाटू लागले. पण नशिबाने साथ दिली नि अखेरीस आम्हाला मनोजागती जागा आमच्या सध्याच्या फ्लॅटपासून अगदी थोड्याच अंतरावर मिळाली. आता काही दिवसातच नविन घराच्या बांधकामाला सुरूवात होईलही!

अर्थात एवढे सगळे होऊनही आमचा घराचा शोध चालूच आहे! बंगला बांधून होईपर्यंत काही महिने तरी आम्हाला भाड्याच्या घरात काढायचे आहेत, तुमच्या माहितीत आहे एखादे रिकामे घर?

ता.क. माझ्या जालनिशीवरची जुन्या घरातली ही शेवटची नोंद ठरेल काय?

No comments:

Post a Comment