रमेश मंत्र्यांची 'प्रारंभ' कादंबरी नुकतीच वाचून संपवली नि एका रसिक मनुष्याने लिहिलेले एक रसाळ पुस्तक वाचण्याचा आनंद मिळाला. खरेतर मराठीत लेखकांची आत्मचरित्रे फार नाहीत. म्हणजे लेखकांनी स्वत:बद्दल अनेकदा लिहिले आहे खरे, पण आपल्या संपूर्ण आयुष्याला शब्दबद्ध करणारे साहित्यिक विरळेच! आचार्य अत्र्यांचे 'क-हेचे पाणी', गंगाधर गाडगीळांचे 'एका मुंगीचे महाभारत' असे काही अपवाद. पण रमेश मंत्र्यांनी आपले आत्मवृत्त लिहिले आहे आणि ते नुसतेच न लिहिता अगदी प्रामाणिकपणे, कसलाही आडपडदा न ठेवता लिहिले आहे!
मंत्र्यांच्या आयुष्याचे जन्मापासून साधारण तरूणपणापर्यंतचे चित्रण या पुस्तकात आहे. पुस्तकाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंत्र्यांचा प्रामाणिकपणा नि कुठलीही गोष्ट न लपवता जे जसे घडले तसेच ते सांगण्याची त्यांची भूमिका. आपल्या (किंवा इतरांच्याही) आयुष्यातले कुठलेच गुपित मंत्र्यांनी दडवून ठेवलेले नाही. जे जसे घडले तसे ते त्यांनी अगदी सरळ वाचकांसमोर मांडले आहे. मंत्र्यांचे सगळेच कसे खुल्लमखुल्ला आहे, नदीच्या डोहातल्या निखळ पाण्यातून त्याचा तळ एखाद्या गरम दुपारी स्पष्ट दिसावा असे काहीसे. हा मोकळेपणा विशेष आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. असे करायला विलक्षण धैर्य लागते, मनाचा विलक्षण निग्रह लागतो, तो मंत्र्यांकडे आहे. त्यामुळेच पुस्तकात आपल्याला मंत्र्यांच्या पहिल्या चुंबनाविषयी, त्यांच्या सुनंदा, कमलिनी या मैत्रिणींविषयी (आणि मंत्र्यांनी त्यांसोबत घालवलेल्या मधुर क्षणांबद्दलही) वाचायला मिळते. विवाहित स्त्रीयांनी आपल्याला गटवण्यासाठी केलेले सारे प्रयत्न (आणि त्या यशस्वी झाल्यावर आलेले अनुभवही) मंत्री असेच विनासंकोच सांगतात. आपल्या 'विझलेली आग' या पुस्तकाविषयी किंवा ना. सी. फडके यांच्या 'सेकंड क्लास का तुम्हाला मिळाला? मागून भेटा तुम्ही आम्हाला!' या किस्याविषयीही मंत्री असेच हातचे काहीही राखून न ठेवता लिहितात. आत्मचरित्र असे हवे! केवळ आपल्याला रूचतील अशा काही निवडक गोष्टीच सांगणारे किंवा इतर जण दुखावतील म्हणून त्यांच्याविषयी न लिहिणारे आत्मचरित्र खरे कसे म्हणावे?
पुस्तकाचा दुसरा विशेष म्हणजे त्यातली रसाळ भाषा. 'रसाळ' या शब्दाचा वापर जरी हलक्या हाताने होत असला तरी मराठीत रसाळ लिहिणारे लेखक अगदी थोडे आहेत, अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे. आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गंगाधर गाडगीळ ही काही चटकन डोळ्यांसमोर येणारी नावे. या नामावलीत रमेश मंत्र्यांचे नाव टाकायला काहीच हरकत नसावी. या पुस्तकातली भाषा विलक्षण रसाळ आहे आणि मला वाटते याचे मूळ मंत्र्यांच्या रसिक स्वभावात आहे. जीवनातला कुठलाही अनुभव घ्यायला मंत्र्यांची ना नाही, किंबहुना कुठलाही नवा अनुभव घ्यायला ते सदैव उत्सुक आहेत. ब-याचदा आत्मवृत्तांना कंटाळवाण्या रोजनिश्यांचे स्वरूप येतो, या पुस्तकाचे मात्र तसे नाही. ते वाचताना आपण एक पुस्तक वाचत आहोत असे वाटतच नाही, असे वाटते की मंत्री आपले बोट धरून आपल्याला त्या काळात ओढून नेत आहेत नि त्या घटना घडतानाच आपल्याला प्रत्यक्षात दाखवत आहेत. यामुळेच की काय, हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही; पुढे काय होईल, मंत्र्यांच्या आयुष्यात पुढे कुठली चमत्कारिक घटना घडेल हा प्रश्न वाचकाला सतत पडत रहातो!
पुस्तक वाचताना पानापानावर जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे रमेश मंत्र्यांची जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची वृत्ती. मंत्र्यांवर अनेक संकटे आली, परिस्थितीने अनेक चटके त्यांना दिले तरीही ते त्रासलेले किंवा वैतागलेले दिसत नाहीत. गर्भश्रीमंत बालपणापासून कर्जबाजारी तारूण्यावस्थेच्या प्रवास मंत्र्यांनी केला पण त्याबद्दल एक कटू अवाक्षरही ते काढत नाहीत. आपल्या आयुष्यात घडलेले आनंददायक किंवा दु:खदायक प्रसंग मंत्री तेवढ्याच अलिप्तपणे कथन करतात. आपला भाऊ अण्णा यानं वीस हजार रू. उडवून आपल्याला कॉलेजच्या फीसाठीही कसं महाग केलं हे ज्या सहजतेने मंत्री सांगतात तेवढ्याच सहजतेने 'सकाळ'चे नानासाहेब परूळेकर यांनी आपल्याला परदेशगमनासाठी एक हजार रूपये दिले तेही सांगतात. मंत्र्यांनी इतरांबाबत खरेखुरे लिहिले आहे असे मी म्हटलो, पण त्याचा उपयोग त्यांनी जुने हिशोब चुकते करण्यासाठी केलेला नाही. वाईटाला वाईट म्हणतानाच, चांगल्याला चांगले म्हणण्याइतका दिलदारपणाही त्यांनी दाखवलेला आहे.
या आत्मचरित्राचे 'मध्यम' नि 'अंत' असे पुढचे दोन भाग लिहिण्याचा मंत्र्यांचा मानस होता पण दुर्दैवाने तो पुरा होऊ शकला नाही. ९२ साली हे पुस्तक लिहून पूर्ण झाल्यावर ९३ सालच्या सप्टेंबर महिन्यात मंत्र्यांना अतिरक्तदाबामुळे पक्षाघात झाल्याने पुढच्या दोन्ही पुस्तकांचे काम थांबले. अर्थात मंत्री त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहू शकले नि तो आपल्याला वाचायला मिळाला यातच आपण समाधान वाटून घ्यायला हवे, नाही का?
केवळ मंत्र्यांच्या चाहत्यांनीच नव्हे तर प्रत्येक मराठीसाहित्यप्रेमी व्यक्तीने वाचावे असेच हे पुस्तक आहे!
प्रारंभ
रमेश मंत्री
अनुभव प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती : १ जुलै १९९५
किंमत : २२५ रू.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment